जालना: MPSC मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. जालन्यातील वाहेगाव येथील डॉक्टर सोनाली पाईकराव यांचंही प्रवर्ग एक अधिकारी या गुणवत्ता यादीमध्ये नाव आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी क्लास वन अधिकारी होणार हे हे निश्चित झालंय. विशेष म्हणजे विवाहानंतर त्यांनी हे यश मिळवलं असून त्यांच्या यशात कुटुंबीय आणि पतीची मोलाची साथ राहिलीय.
advertisement
लहानपणापासून व्हायचं होतं अधिकारी
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात वाहेगाव हे छोटसं गाव आहे. याच गावामध्ये पाईकराव कुटुंब राहते. कुटुंबामध्ये एकूण पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. पाच बहिणी पैकी एक बहीण राज्यकर अधिकारी तर एक शाळेवर शिक्षिका आहे. घरात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण असल्याने सगळ्या मुलींनी उच्च शिक्षण घेतले. सोनाली पाईकराव यांनी देखील बीएचएमएसचे शिक्षण पूर्ण केले. मात्र लहानपणापासूनच अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
विवाहानंतर पतीची साथ
सोनाली यांचा विवाह डॉक्टर चेतन कुमार खंडेलोटे यांच्याशी झाला. तेव्हा त्यांनी आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न सांगितलं. त्यांनी देखील सोनाली यांच्या इच्छेला होकार दर्शवत एमपीएससीचा अभ्यास करण्यास सांगितले. 2019 पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मात्र घरी राहून अभ्यासात अडथळे निर्माण होत होते हे त्यांच्या पतीच्या लक्षात आले आणि त्यांनी पुणे येथे जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सोनाली यांना मिळालेल्या यशाचा अभिमान असल्याचे पती डॉ. चेतन सांगतात.
मराठी शाळेत शिक्षण अन् अमेरिकेत डंका, शिक्षक कन्येला कसं मिळालं दीड कोटींचं पॅकेज? Video
पहिल्याच प्रयत्नात यश
पुणे येथे अभ्यासाला गेल्यानंतर सोनाली यांनी मागे वळून पाहिलंच नाही. जिद्दीने अभ्यास करत त्यांनी पूर्व परीक्षा पास केली. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी तिन्ही टप्पे पार करून त्यांनी राज्यसेवा परीक्षेत शिखर पार केलं. हा प्रवास खूप खडतर होता. ग्रामीण भागातील झेडपीची विद्यार्थिनी म्हणून खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. या प्रवासात माझ्या कुटुंबीयांची भक्कम साथ मला मिळाली. मला जे यश मिळालं या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे. अधिकारी म्हणून काम करताना संवेदनशीलतेने काम करणं आणि माझ्या कामामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ होईल हा प्रयत्न करणे हे माझं उद्दिष्ट असेल, असं डॉक्टर सोनाली सांगतात.
प्लॅन बी तयार ठेवा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना डॉक्टर सोनाली मोलाचा सल्ला देतात. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश आणि अपयशही पदरी येऊ शकतं. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांनी आपला प्लॅन बी ठेवावा. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते, असे डॉ. सोनाली सांगतात.