प्रियांका अविनाश जाधव ही मूळची कराड तालुक्यातील शेणोली गावची असून ती दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. नुकताच एमपीएससीच्या महसूल सहाय्यक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रियांकानं नेत्रदीपक यश मिळवलंय. सुशिक्षित कुटुंबात जन्मलेली प्रियांका वडिलांच्या नोकरीनिमित्त पुण्यामध्ये स्थायिक होती.
advertisement
9 वर्षांची असताना अंधत्व
"कन्येच्या जन्माने आमचा संसार फुलला, आम्ही आनंदी झालो. परंतु ती आठ-नऊ वर्षांची होताच दुर्दैवाने तिच्या डोळ्यांतील अंधत्व वाढू लागले. वैद्यकीय सल्ले घेऊन देखील पुढच्या चार-पाच वर्षात ती संपूर्ण दृष्टिहीन झाली. आमच्यावर आभाळ कोसळले. पण प्रियांका अभ्यासात चांगली असल्याने आमचे धैर्य वाढले." असे प्रियांकाचे वडील अविनाश जाधव सांगतात.
स्कॉलर विद्यार्थिनी
प्रियांकाला दृष्टी नाही परंतु, तिची आकलन क्षमता उत्तम आहे. पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड असल्याने ती शिक्षकांचे बोलणे मन लावून ऐकत होती. एकाग्रतेच्या जोरावर ऐकलेल्या गोष्टी स्मरणात ठेवत असे. सहाय्यक लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडवत असे. प्रियांकाने थेरगाव (पुणे) येथील प्रेरणा हायस्कूल व लोकमान्य टिळक विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पूर्णतः अंध असल्याने तिच्या वाचन, लिखाणाचा सर्व भार आई सुजाता पेलत होत्या. दहावीत चांगल्या गुणांनी तसेच बारावीच्या परीक्षेत ती महाविद्यालयात प्रथम आली. पुणे येथील श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठातून तिने अर्थशास्त्रातून पदवीचं शिक्षण घेतलं.
अशी केली MPSC ची तयारी
पदवीच्या तिसऱ्या वर्षांत असताना शासकीय सेवेत दिव्यांगांना राखीव जागा असल्याचे समजले. तेव्हा तिने लोकसेवा व राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीपासूनच अनेक अडचणी येत होत्या. जन्मापासून आई-वडील आणि भाऊ प्रसाद यांच्या सोबतीने घरी राहून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारी प्रियांका MPSCच्या तयारीसाठी पहिल्यांदाच स्वतःचे कुटुंब सोडून बाहेरच्या जगात राहिली.
एका दिव्यांग व्यक्तीने आपले कुटुंब सोडून बाहेरच्या लोकांसोबत राहणे हे अगदी धाडसाचे काम. परंतु, प्रियांकाची जिद्द मोठी आहे. तिने मित्र-मैत्रिणींवर विश्वास ठेवत स्वप्नांसाठी अकॅडमी, रूमवर राहण्याचे धाडस केले आणि निभावले. तिच्या स्वभावातील माया आणि सुसंस्कृतपणामुळे तिला चांगल्या मैत्रिणी भेटल्या.
अकॅडमीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सराव अभ्यासासाठी प्रियांकाने मैत्रिणीसोबत रूम करून राहण्याचे ठरवले. पुढे जिवलग मैत्रीण सरिता व तिचा भाऊ अभिजित निवास निकम या दोघांची साथ मिळाली. सरिता व अभिजीत या सख्या बहिण-भावांसोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहून प्रियांकाने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले.
प्रियांकाने आत्तापर्यंत राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या शासकीय सेवेतील चार पदांसाठी परीक्षा दिल्या आहेत. कर सहाय्यक पदासाठी नुकतीच परीक्षा दिली आहे. सध्या ती महसूल सहाय्यक परीक्षेमध्ये यशस्वी झाली आहे. प्रियांकाच्या यशाने कुटुंबासह, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि गाव परिसर आनंदी झाला आहे.
मोबाईलचा उत्तम वापर
अंधत्वामुळे प्रियांकाला संदर्भ पुस्तके वाचण्यावर मर्यादा येत होत्या. सरिता आणि अभिजीत सोबत बरीच रिव्हिजन होत होती. परंतु, स्पर्धा परिक्षेचा प्रचंड अभ्यासक्रम असल्याने काही मुद्दे प्रियांका युट्यूबच्या वापरातून पूर्ण करते. मनोबल वाढवण्यासोबतच अभ्यासाच्या सरावासाठी प्रियांका मोबाईलचा उत्तम वापर करत असल्याचे मैत्रिणी सांगतात.
अफाट जिद्द, खंबीर मनोबल, संयमी स्वभाव, अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर प्रियांकाने मिळवलेले यश तिच्यासह कुटुंबाच्या आशेचा प्रकाशमय किरण ठरला आहे. आई-वडिलांचा पाठिंबा, भावाची साथ, मित्र-मैत्रिणींची संगत आणि आत्मविश्वासू प्रियांकाचे उभे आयुष्यच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते आहे.