पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात
गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आजपासून महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा 15,631 पदांचा समावेश आहे. यावर्षी उमेदवारांसाठी एक विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, सन 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत संधी देण्यात येणार आहे.
advertisement
पोलिसांची रिक्तपदे
पोलिस शिपाई : 12,399
चालक शिपाई : 234
सशस्त्र पोलिस शिपाई :2,393
कारागृह शिपाई : 580
बॅण्डसमन : 25
एकूण : 15,631
कुठे कराल अर्ज?
मागील वर्षी राज्यात 18 हजारांहून अधिक पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती. यंदाही 15 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच पूर्ण एक महिना सुरू राहणार आहे. उमेदावारांना अर्ज करण्यासाठी गृह विभागाने policerecruitment2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
निवड प्रक्रिया कशी?
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उमेदवारांना यंदा दोन टप्प्यांत परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रथम टप्प्यात 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. लेखी परीक्षेत देखील किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य करण्यात आले आहे.शारीरिक आणि लेखी परीक्षेतील गुण एकत्र करून, म्हणजेच एकूण 150 गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.






