प्रगल्भ राऊळ सांगतात की, लहानपणी त्यांच्या परिसरातून आर्मीची परेड निघायची. त्यावेळी त्यांचे आजोबा त्यांना परेड पाहण्यासाठी घेऊन जायचे. सैनिकांना मिळणारा सन्मान आणि आदर पाहून त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. घरी आल्यावर त्यांनी आजोबांना विचारले की या लोकांना इतका मान का दिला जातो. त्यावेळी आजोबांनी सांगितले की हे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्याच क्षणी प्रगल्भ यांनी ठरवले की भविष्यात आपल्यालाही सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे.
advertisement
Success Story : तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, ज्ञानेश्वरला 8 लाखांचा नफा
या ध्येयासाठी त्यांनी लहानपणापासूनच तयारी सुरू केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी सी कॅडेट कॉर्प्सच्या ट्रेनिंग शिप जवाहर येथे चार वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी-बारावी पूर्ण झाल्यावर त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी एनसीसीचे प्रशिक्षणही पूर्ण केले. सैन्यात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी एसएसबी परीक्षा देण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. सलग सहा वेळा अपयश आले, तरीही त्यांनी हार मानली नाही. सातव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत लेफ्टनंट पद मिळवले.
या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातील सर्वात मोठा किस्सा म्हणजे त्यांचे वजन. प्रशिक्षणासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी त्यांनी अवघ्या 28 दिवसांत तब्बल 20 किलो वजन कमी केले. त्या काळात त्यांनी दिवसाला फक्त एक सफरचंद आणि लिंबूपाणी घेऊन कठोर मेहनत घेतली.
प्रगल्भ यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की ते लहानपणापासूनच स्काउट-गाईड आणि एनसीसीमध्ये सक्रिय होते. त्यांना वाढताना, खेळताना आणि मेहनत करताना आम्ही पाहिले आहे. आज ते लेफ्टनंट झाले याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.
प्रगल्भ यांच्या आई-वडिलांनाही मुलाच्या यशाचा मोठा अभिमान आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचा मुलगा देशसेवेसाठी समर्पित झाला याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. दादरकरांसाठीही हा अभिमानाचा क्षण असून परिसरातील प्रत्येकजण त्यांच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.





