सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड अनेक वर्षांपासून ऐकू येते. त्यामुळे पटसंख्येअभावी या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात. परंतु अनेक मराठी शाळांमध्येही यशस्वी विद्यार्थी घडतात. आजही अशा अनेक प्रसिद्ध मराठी शाळा अस्तित्त्वात आहेत. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पापरी गावच्या जिल्हा परिषद शाळेचं सर्व स्तरावर कौतुक होतंय. कारण इंग्रजी खासगी शाळांच्या गर्दीत या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या शाळेत केवळ पापरीतील विद्यार्थीच नाही, तर इतर 5 ते 6 गावांमधील विद्यार्थीदेखील शिकतात. आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने या शाळेने जिल्ह्यातील सर्व शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
advertisement
या शाळेला 13 वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. शाळेतील 25 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. 260 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झाली आहे. नवोदय उपक्रमासाठी 70 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर, सातारा सैनिक स्कूलसाठी इथल्या 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसंच या शाळेला सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळख मिळाली आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळेत 10 विद्यार्थी दिसणंही अवघड असताना या शाळेचा इयत्ता पहिली ते आठवीचा पट आहे 742.
हेही वाचा : Butterfly, Butterfly...Trend, शिक्षकानं लढवली शक्कल, विद्यार्थी संख्या अचानक वाढली!
येथील शिक्षक दत्तात्रय डोके यांनी सांगितलं की, 'शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. शाळेला 15 वर्षांपूर्वी ISO मानांकन प्राप्त झालं. शाळेत इयत्ता 5वी पासून सेमी इंग्रजी सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध आहेत. तिथे LEDच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या करून दाखवल्या जातात. परीक्षा, नवोदय, क्रीडा स्पर्धा, स्कॉलरशिप अशा विविध उपक्रमांमध्ये शाळा सहभागी असते. आजूबाजूच्या आठ गावांतील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छूक आहेत, परंतु वर्गसंख्या आणि शिक्षकसंख्या कमी असल्यानं आम्ही मुलांना प्रवेश देऊ शकत नाही. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात.'
हेही वाचा : दिवसा वर्ग, रात्री बेडरूम...मुख्याध्यापिकेचे शाळेत नको ते कारनामे! मुलांनी शिकायचं कसं?
दरम्यान, या शाळेचा जिल्ह्यात मोठा बोलबोला आहे. शाळेनं एखादा उपक्रम राबवायचं ठरवलं की, त्याबाबत सर्वात आधी गावकऱ्यांना माहिती दिली जाते. मग त्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी फार वेळ लागत नाही. शाळेकडून स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा हे उपक्रम गेली अनेक वर्षे राबवले जातात.