सोलापूर : आपल्या लेकीनं मोठा अधिकारी व्हावं असं स्वप्न सोलापुरातील भाजीविक्रेत्या आई-बापानं पाहिलं. त्यासाठी जीवाचं रान करून लेकीला शिकवलं. लेकीनंही दिवस-रात्र एक करून अभ्यास केला आणि शेवटी यशाचा सोनेरी दिवस उगवला. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्वाती मोहन राठोड हिनं घवघवीत यश संपादन केलंय. अनेक संकटांचा सामना करत तिनं 492 वी रँक मिळवलीय. त्यामुळे कुटुंबीयांसह सोलापूरवासियांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
स्वातीचा संघर्षमय प्रवास
स्वाती मोहन राठोड ही मुळची सोलापुरातील बंजारा कुटुंबातील आहे. घरची परस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला सातत्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. घरात तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. विजापूर रोडवरील आदित्यनगर परिसरात राठोड कुटूंब भाड्यात घरात राहतं. याच परिसरात स्वातीचे आई-वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, परिस्थितीशी दोन हात करत लेकीला मोठा अधिकारी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
4 वेळा अपयश पण तो खचला नाही, UPSC परीक्षेत पुणेकर शुभमनं बाजी मारलीच! Video
मुंबई आणि सोलापुरात शिक्षण
स्वातीनं प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत पूर्ण केलं. दहावीपर्यंत ती मुंबईत शिकली. आई-वडिलांना मुंबईतील खर्च परवडेना म्हणून ते सोलापुरात राहायला आले. त्यानंतर स्वातीचं अकरावी आणि बारावीचं शिक्षण सोलापुरातील भारती विद्यापीठात झालं. जुळे सोलापुरातील वसुंधरा महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेऊन तिनं वालचंद महाविद्यालयातून भूगोल विषयाचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शिक्षण सुरू असतानाच तिला एका कार्यक्रमातील भाषणात युपीएससी बद्दल माहिती मिळाली आणि तिनं युपीएससी परीक्षेचा अभ्यास करून अधिकाऱी होण्याचा निर्धार केला.
कार्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली अन् सुरू केला अभ्यास, नागपूरच्या संस्कारचं UPSC परीक्षेत यश, Video
पाचव्या प्रयत्नात यश
स्वातीने परिस्थितीशी संघर्ष करत अभ्यास सुरू केला. चारवेळा परीक्षा दिली. पण अपयश आलं. मात्र, अपयशानं खचून न जाता तिनं जिद्दीनं प्रयत्न सुरूच ठेवले. अडचणींपेक्षा मी सोल्यूशनला महत्त्व दिलं आणि त्यावर काम केलं, असं स्वाती सांगते. त्यानंतर 2023 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षएचा निकाल जाहीर झाला आणि स्वातीला पाचव्या प्रयत्नात यश मिळाले.
बंजारा समाजातील पहिलीच मुलगी
यूपीएससी परीक्षेत यश मिळविणारी स्वाती राठोड ही सोलापूरच्या बंजारा समाजातील पहिलीच मुलगी आहे. स्वातीच्या यशाचा अभिमान आहे, अशी भावना तिच्या आईनं व्यक्त केली. तर स्वातीनं गरीब परस्थितीवर मात करत मिळवलेल्या यशामुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.