विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : पती-पत्नीमध्ये नेहमी छोट्या-मोठ्या कारणातून वाद होत असतात. मनात संशयाने घर केले की संसार आणि नाती या सर्वांचीच माती होते. अशीच एक भयंकर घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. लोहारा येथे मध्यरात्रीच्या सुमारास पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन शिंदे असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आला आहे.
advertisement
पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन नितीन शिंदे हा आपल्या पत्नीला मारहाण करत होता. तसेच घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी देखील तगादा लावला होता. पैसे न आणल्याने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण करत होता. यातूनच झोपेत असलेल्या पत्नीवर हल्ला करत नितीन शिंदे याने पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी पोलिसांसह फॉरेनसिक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मृत विवाहिता कविताचा भाऊच्या फिर्यादीवरून पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
पत्नीची हत्या करून नितीन शिंदे हा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नितीन शिंदे हा आपल्या पत्नीला मारहाण करत होता तसेच घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होता, अशी फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ आकाश सपकाळ याने दिली आहे. पती नितीन शिंदे व सासू बेबाबाई शिंदे यांनी मिळून बहीण कवितावर हल्ला करत तिची हत्या केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांकडून आता सखोल तपास केला जात आहे.