अलिगढ : उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील टीव्हीएस बाइक शोरुम मालकाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदू महासभेशी संबंधित असलेली महामंडलेश्वर पूजा पांडेय यांचे नाव समोर आले आहे. पूजा पांडेय हिने मारेकऱ्यांना तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याने पोलीस चौकशीत धक्कादायक आरोप केले आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी अभिषेकची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अटक केलेल्या शूटरने चौकशीदरम्यान कबूल केले की, दीड महिन्यापूर्वी तीन लाख रुपयांमध्ये हा करार झाला होता. हत्येपूर्वी दोन दिवसांची रेकी करण्यात आली होती. घटनेच्या रात्री पूजा शकुन पांडेचा पती अशोक पांडे आणि शूटर्समध्ये 27 वेळा फोनवर संभाषण झाले.
संन्यास घेतल्यानंतर पूजा झाली महामंडलेश्वर
2017 मध्ये पूजा शकुन पांडेने संन्यास घेऊन महामंडलेश्वरचा दर्जा मिळवला. संन्यास घेतल्यानंतर तिचे नाव अन्नपूर्णा भारती झाले. तथापि, तिची धार्मिक ओळख असूनही, तिचे वैयक्तिक जीवनात वाद झाल्याचे दिसून आले. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडताना व्हिडीओ व्हायरल झाला होता.
मृताच्या वडिलांचे आरोप
अभिषेकच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एक महत्त्वाचा आरोप केला. त्यांनी सांगितले की पूजाचे त्यांचा मुलगा अभिषेकसोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि त्याला अनैतिक संबंधात अडकवल्याचाही आरोप त्यांनी केला. संन्यासीचे वेश धारण करूनही, पूजा अनेकदा अभिषेकसोबत सामान्य महिलेप्रमाणे पार्ट्यांमध्ये सहभागी होत असे. तिच्याकडून होणाऱ्या त्रासाला व्यथित होऊन अभिषेकने तिचा नंबरही ब्लॉक केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिसांची कारवाई
अलीगड पोलिसांनी आतापर्यंत पूजाचा पती अशोक पांडे आणि या प्रकरणात एका गोळीबार करणाऱ्याला अटक केली आहे. महामंडलेश्वर पूजा आणि आणखी एका मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रकरण काय?
हाथरस जिल्ह्यातील हंसयन पोलीस स्टेशन परिसरातील कचोरा गावातील रहिवासी अभिषेक गुप्ता हे खैर येथे टीव्हीएस बाईक शोरूम चालवत होते. 26 सप्टेंबरच्या रात्री ते घरी परतण्यासाठी हाथरसला बसने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. 27 सप्टेंबर रोजी मृताचा धाकटा भाऊ आशिष याने लेखी तक्रार दाखल केली. महामंडलेश्वर डॉ. अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकुन पांडे आणि त्यांचे पती अशोक पांडे यांच्यासह दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात अशोक पांडेचे नाव असल्याने रविवारी पोलिसांनी अशोक पांडे यांना अटक केली. तर, एका मारेकऱ्याला अटक करण्यात यश मिळाले आहे.