Mumbai Crime News : मुंबईतील अंधेरी भागातील दुहेरी हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असलेल्या तरुणानं आपल्याच वडिलांसह आजोबांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणानं काकांवरही हल्ला केला. या घटनेनंतर तरुण रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलिसांसमोर हजर झाला. या कृत्यामागे त्याने लहानपणापासून सुरू असलेल्या छळाला कंटाळून पाऊल उचलत असल्याचे म्हटले.
advertisement
अंधेरी पूर्वेतील संतोषी माता चाळीत मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन भत्रे (23) डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो बुधवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस चौकीत आला आणि वडील, काका व आजोबांवर हल्ला केल्याची कबुली दिली.
या हल्ल्यात चेतनचे वडील मनोज भत्रे (57) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजोबा बाबू भत्रे (79) देखील घटनास्थळी ठार झाले. काका अनिल भत्रे (54) गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडील-आजोबांना का संपवलं?
प्राथमिक चौकशीत चेतनने सांगितले की, लहानपणापासून आजोबा, काका आणि वडील हे त्याला आणि त्याच्या आईला सातत्याने छळत होते. या त्रासामुळेच आईला घर सोडावे लागले. तिघेही दारू पिऊन त्याला व त्याच्या बहिणीला वारंवार त्रास देत. दोघांचेही पगार हिसकावून घेत, पैसे न दिल्यास घरात गोंधळ घालत, असा जबाब आरोपी चेतनने दिला.
मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चेतन कामावरून घरी आल्यानंतर पुन्हा वाद झाला. वडील पैशांसाठी ओरडू लागले आणि आजोबा व काकाही त्यांच्यासोबत भांडणात सहभागी झाले. संतापाच्या भरात चेतनने स्वयंपाकघरातील चाकू उचलून वडिलांचा गळा चिरला, त्यानंतर आजोबा आणि काकांवर हल्ला केला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी यांनी सांगितले की, चेतन भत्रेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.