विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील महत्त्वाचे मध्यवर्ती तुरुंग असणाऱ्या ऑर्थर रोड जेलमध्ये कैद्यांमध्ये राडा झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आर्थर रोड जेलमध्ये दोन कैदामध्ये प्रचंड हाणामारी झाली. त्यात मध्यस्थी करणान्या कारागृह अधिकाऱ्यावर एका कैद्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राकेश चव्हाण हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
राकेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर अफान सैफीउदीन खान नावाच्या आरोपी कैदीविरुद्ध एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गंभीर दुखापतीसह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक केली जाणार आहे. अफान खान हा एका गुन्ह्यांत सध्या आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
शनिवारी दुपारी अफान खान याचे इम्तियाज इस्तियाक खान या कैद्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यात हाणामारी झाली होती. हा प्रकार लक्षात येताच कारागृह अधिकारी राकेश चव्हाण यांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न करून दोघांना बाजूला केले होते. त्याचा राग आल्याने अफानने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करून गेटवर त्यांचे डोके जोरात आदळले होते., त्यात राकेश चव्हाण हे जखमी झाले होते.
हा प्रकार इतर कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी अफानला ताब्यात घेऊन बॅरेक दोनमध्ये टाकले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या राकेश चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी राकेश चव्हाण यांच्या जबानीनंतर घ्रडलेला प्रकार उघडकीस आला.