खरवळ येथील वीरनगरमध्ये राहणाऱ्या वैशाली नामदेव चव्हाण (वय 40) या महिलेवर शेतातून घरी परतताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. वैशाली या रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. उपचारासाठी त्यांना तातडीने हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रथमदर्शनी ही घटना अपघाती वाटत होती. मात्र शवविच्छेदन आणि डोक्यावरील गंभीर जखम पाहता पोलिसांनी यामागे घातपात असल्याचा अंदाज व्यक्त केला. यानंतर वैशालीच्या पतीने हरसूल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाची तक्रार दाखल केली.
advertisement
तपासाच्या सुत्रांना गती देत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळावर असलेल् चौकशी केली. एका शेतकऱ्याने वैशाली ज्या दिशेने जात होती तिकडे एक उंच पुरुष धावत जात असल्याचं सांगितलं. आणखी एका व्यक्तीने, वैशालीच्या घरी आणि पतीकडे पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती दिली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. काळा शर्ट, पांढरा पट्टा आणि निळसर पॅण्ट घातलेल्या व्यक्तीच्या शोधात असताना, भगवान पांडुरंग शिंदे (रा. वीरनगर) हा इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला. ग्रामस्थांकडून आणि पतीकडून खात्री झाल्यावर पोलिसांनी त्याला मुसळधार पावसात अटक केली.
सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. वैशालीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने आणि त्यावरून तिच्याकडून कानाखाली मार खाल्ल्याने संतप्त झालेल्या भगवान शिंदेने जवळील लाकडी दांड्याने तिच्या डोक्यावर वार करत हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला होता.