तपासाची चक्रे फिरली आणि चोरटा जाळ्यात
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 80 हजार रुपयांची महागडी इलेक्ट्रिक सायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहायक निरीक्षक डॉ. समाधान हिरे आणि हवालदार चंद्रकांत गवळी यांना एका संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. युनिट-2 चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचला. अर्जुन वाणी हा चोरीची सायकल विकण्यासाठी आला असताना साध्या वेशातील पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले.
advertisement
सायकल चोरीची अनोखी 'मोडस ऑपरेंडी'
वाणी हा अत्यंत चलाखीने गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे. इंटरनेटवरून नामवंत सायकल दुकानांची नावे शोधून तो बनावट बिले तयार करायचा. त्यानंतर कलर प्रिंट काढून ग्राहकांना ती खरी असल्याचे भासवून सायकली विकायचा. शहरात आल्यावर तो स्वस्त लॉज शोधून तिथे राहायचा आणि परिसराची रेकी करून सायकली लंपास करायचा.
पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, सायकल चोरीची तक्रार लोक सहसा करत नाहीत आणि पोलीसही गांभीर्याने तपास करत नाहीत. तसेच सायकल चोरणे आणि विकणे इतर वाहनांच्या तुलनेत सोपे असते.
6 जिल्ह्यांत गुन्ह्यांचा सपाटा
अर्जुन वाणी याच्यावर नाशिकसह जळगाव, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या सहा जिल्ह्यांमध्ये 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी रक्षाबंधनाला तो हर्सूल कारागृहातून सुटला होता, मात्र बाहेर येताच त्याने पुन्हा नाशिकमध्ये चोरीचा सपाटा लावला.
दरम्यान, नागरिकांनी जुनी सायकल खरेदी करताना बिलाची सखोल पडताळणी करावी आणि संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






