कैलास हरड असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर छकुली बाळकृष्ण केदार असं आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित तरुणीचं नाव आहे. ती मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर गावातील रहिवासी होती. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 मे 2025 रोजी तिचा विवाह शहापूर तालुक्यातील खरीवली गावातील रहिवासी कैलास हरड याच्या सोबत झाला होता.
लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत सासरच्यांनी छकुलीचं जीवन नरक बनवलं होतं. पैशांसाठी तिचा छळ केला जात होता. काही दिवसांपूर्वी आरोपींनी छकुलीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तिने वडिलांकडून हे पैसे आणावेत म्हणून पतीसह तिच्या सासरच्यांकडून दबाव टाकला जात होता. पण छकुली हे पैसे आणू शकली नाही. यानंतर आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला, असा आरोप मयत छकुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
'फ्लॅटसाठी २० लाख रुपये आण'
यानंतर आरोपींनी फ्लॅट घेण्यासाठी देखील छकुलीकडे २० लाखांची मागणी केली. तू तुझ्या बापाकडून 20 लाखा घेऊन ये, असं म्हणत आरोपींनी तिला मारहाण केली. या प्रकारानंतर पीडितेनं सासरच्या मंडळींना समजून सांगितले की माझे वडील एक वडापावची गाडी चालवतात. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील, पण तरीही सासरच्यांकडून छळ सुरू होता, अशी माहिती मृत छकूलीची आई रंजना बाळकृष्ण केदार यांनी दिली.
रंजना केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती कैलास हरड याला अटक केली आहे. पुढील तपास किन्हवली पोलीस करत आहेत. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात तरुणीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
