28 एप्रिल 2023 ला मोठ्या थाटात विवाह
वैष्णवीचा विवाह 28 एप्रिल 2023 रोजी शशांक हगवणे याच्याशी सनी वर्ल्ड, सुसगाव येथे मोठ्या थाटात पार पडला. या विवाहासाठी अनिल कसपटे यांनी 51 तोळे सोनं, टॉप-एंड फॉर्च्यूनर गाडी, दुचाकी, दीड लाखाचे घड्याळ, चांदीच्या भांड्यांचा सेट, आणि 4 हजार नागरिकांसाठी जेवण असा भरघोस हुंडा दिला होता.
advertisement
लग्नानंच्या दुसऱ्याच दिवशी किरकोळ कारणांवरून वाद
लग्नानंतर वैष्णवी शशांकसोबत मुक्ताई गार्डनजवळील भुकूम येथे राहायला गेली. मात्र, दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणांवरून वाद घालायला सुरुवात केली. तिच्या सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा आणि दिर सुशील यांनी वेळोवेळी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेषतः चांदीची भांडी न दिल्याने सासरच्या मंडळींनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. या छळाला कंटाळून वैष्णवीने 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध (रॅट पॉईझन) खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता वैष्णवी हगवणे हिने 16 मे 2025 गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र हा मृत्यू हुंड्यासाठीच्या छळामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
पैसे संपूर्ण दिले नाहीत तर खानदानाचा नाश करीन
वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शशांक हे माझ्या राहत्या घरी आले होते आणि त्यांनी 2 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसे द्यावेत, अशी मागणी केली. त्यावेळी माझ्याकडे आर्थिक अडचण असल्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की माझ्याकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांनी इतरत्र काही पर्याय शोधावेत.
या नकारामुळे शशांक नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्या घरी जाऊन माझ्या मुलीला, वैष्णवीला, धमकी दिली. त्यांनी तिला असे म्हटले की, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत. तुझ्या बापाला काय भिक लागली आहे का? मी तुला काय फुकट पोसणार आहे का? जर तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या संपूर्ण खानदानाचा नाश करीन, अशा प्रकारे त्यांनी वैष्णवीला धमकावले.
या प्रकाराने राग मनात धरून शशांक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि मारहाण करून तिला माहेरी आणून सोडले. यापूर्वीही किरकोळ कारणांवरून तिचे सासरचे लोक तिला मारहाण करून सतत माहेरी पाठवत असत. आम्ही प्रत्येक वेळी तिला समजावून परत सासरी पाठवत होतो.
मार्च 2025 मध्ये तिची नणंद करिष्मा आणि सासू लता हागवणे यांनी मिळून वैष्णवीला मारहाण केली, शिवीगाळ केली, तोंडावर थुंकले आणि तिचा अपमान करत तिला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून माझ्या राहत्या घरी, वाकड, पुणे येथे आणून सोडले. घरी आल्यानंतर वैष्णवीने आम्हाला संपूर्ण हकीकत सांगितली.
राजकीय दबाव टाकल्याच्या चर्चेमुळे संतापाची लाट
वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्यावर आरोप असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुक्याचे नेते आणि राजकीय पदाधिकारी आहेत. घटनेनंतर ते फरार असून, या प्रकरणात राजकीय दबाव टाकल्याच्या चर्चेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, एक प्रगतशील शेतकऱ्याची एकुलती एक मुलीचा केवळ हुंड्यासाठी बळी गेल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरत आहे.





