'तू आमचा वंश संपवला'; 3 मुली झाल्यानं बीडमधील विवाहितेचा छळ, कंटाळून तिनं सगळंच संपवलं
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या घटनेमुळे तीन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड : तुला तीन मुलीच झाल्या, आमच्या वंशाला दिवा नाही, अशी सततची हिणवणूक, शिवीगाळ आणि शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली. या घटनेमुळे तीन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आजरखेडा (ता. रेणापूर) येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचा विवाह 16 ऑगस्ट 2019 रोजी उंदरी (ता. केज) येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहानंतर दाम्पत्याला राजनंदिनी (वय 5) तसेच आर्या आणि अपूर्वा (वय 4 ) अशा जुळ्या मुलींसह एकूण तीन मुली झाल्या. मात्र मुलगा नसल्याच्या कारणावरून अरुणाला सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
advertisement
आरोपानुसार, पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत अरुणाला शिवीगाळ करत मारहाण करीत असे. तसेच सासू इंदूबाई ठोंबरे आणि सासरे उत्तम ठोंबरे हे मुलगा हवा होता, तू आमचा वंश संपविलास, अशा शब्दांत तिला मानसिक त्रास देत होते. या छळामुळे अरुणा मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. तिने हा सर्व प्रकार वेळोवेळी आपल्या आई-वडिलांना, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणा यांना फोनवरून आणि माहेरी आल्यानंतर सांगितला होता.
advertisement
अखेर सततच्या छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने 10 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2 वाजता उंदरी येथील राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
advertisement
या प्रकरणी मयत अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात पती उद्धव ठोंबरे, सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे पुढील तपास करत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:06 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'तू आमचा वंश संपवला'; 3 मुली झाल्यानं बीडमधील विवाहितेचा छळ, कंटाळून तिनं सगळंच संपवलं










