23 वर्षीय आकाशच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. घर चालवण्यासाठी त्याने "मां चामुंडा स्वीट अँड नमकीन" नावाने भाड्याने दुकान घेऊन कचोरी विक्री सुरू केली होती. आयुष्य साधंसरळ चाललं होतं. पण अचानक गावकऱ्यांचे डोळे विस्फारले, जेव्हा समजलं की फक्त 500 रुपयांपासून आकाशने अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
त्याने Yamaha R15 बाईक विकत घेतली, जी जवळपास 2.5 लाखांची आहे. त्याचबरोबर त्याने थार गाडी बुक केली आणि साडेतीन लाखांचं सोनंही घेतलं. ही झपाट्यानं बदललेली जीवनशैली लोकांना पचली नाही आणि संशय वाढला. "कचोरी विकणारा मुलगा एवढा श्रीमंत कसा झाला?" असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला.
ही माहिती पोलीसांपर्यंत पोहोचली आणि एसओजीची टीम तपासासाठी पुढे सरसावली. चौकशीतून उघड झालेलं सत्य ऐकून पोलीस सुद्धा हादरले. तपासात समोर आलं की आकाशने बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकच्या खात्यांतून ओव्हरड्राफ्टचा गैरवापर करून करोडोंची कमाई केली होती.
2025 च्या मे महिन्यात त्याने एचडीएफसी बँकेत खाते उघडून फक्त 500 रुपये जमा केले. त्यानंतर 5,000 रुपये ओव्हरड्राफ्टने काढले. थोड्या दिवसांनी 50,000 रुपये जमा केले. हाच प्रयोग पुन्हा पुन्हा करत अखेर 9 व्यवहारांद्वारे त्याने तब्बल 5 कोटी रुपये ओव्हरड्राफ्टमधून उचलले.
या पैशातून त्याने साडेतीन कोटी रुपये "ग्रो" या ऍपच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र बँक आणि पोलीसांच्या तपासात हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आणि आकाशला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणात बँकेतील 3 कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे.