बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. ‘पद्मावत’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘वॉर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली अनुप्रिया आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र, शूटिंगदरम्यान काही अनुभव असेही आले, जे तिला अजिबात आनंददायक वाटले नाहीत.
advertisement
सेटवर अस्वस्थ करणारा अनुभव
यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनुप्रियाने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन प्रसंगी तिला अस्वस्थ वाटले. ती म्हणाली, “पहिल्या वेळी माझा सहकलाकार मला जाणीवपूर्वक त्रास देत होता, असे मी म्हणणार नाही. पण तो अनावश्यक उत्साही झाला होता. एका किसिंग सीन दरम्यान मला हे स्पष्ट जाणवले आणि त्यामुळे मला विचित्र वाटले.”
दुसऱ्या प्रसंगाबाबत सांगताना ती म्हणाली, “एका दृश्यात, जिथे मी आधीच नर्व्हस होते, माझ्या सहकलाकाराने मला पकडताना जाणीवपूर्वक नितंबाजवळ हात ठेवला. तो सहज कंबरेवर हात ठेवू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे मला फारच अस्वस्थ वाटले.”
अनुप्रिया पुढे म्हणाली, “त्या वेळी मी त्याला काही बोलू शकले नाही, कारण तो चूक असल्याचे नाकारू शकला असता. पण मी लगेच त्याचा हात वर करून योग्य ठिकाणी ठेवायला सांगितले आणि पुढच्या टेकमध्ये असे करु नकोस, असे स्पष्ट बजावले. नंतर मात्र त्याने माझे ऐकले.” इंटिमेट सीनबद्दल बोलताना अनुप्रियाने सांगितले, “हे सीन्स फार सहज आणि संयमी पद्धतीने करता येतात. पण काही लोक हे समजून घेत नाहीत आणि त्याचा गैरफायदा घेतात. असे प्रसंग खूप त्रासदायक असतात.”
अनुप्रिया गोएंका हिने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘बॉबी जासूस’, ‘पाठशाला’, ‘सर’, ‘मेरा देश की धरती’ आणि ‘बर्लिन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. त्याचबरोबर ‘सेक्रेड गेम्स’, ‘अभय’, ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘असूर’ आणि ‘सुल्तान ऑफ दिल्ली’ यांसारख्या वेब सिरीजमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.