'राज कॉमिक्स'च्या पात्रांवर येणार चित्रपट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, आर्यन खान आता 'राज कॉमिक्स' मधील चाहत्यांच्या आवडत्या सुपरहिरोंना घेऊन चित्रपट बनवत आहे. यात सुपर कमांडो ध्रुव, नागराज, डोगा यांसारख्या आयकॉनिक पात्रांचा समावेश असेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, एका सोशल मीडिया युजरने या प्रोजेक्टबद्दल काही महत्त्वपूर्ण अपडेट्स दिले आहेत.
advertisement
राज कॉमिक्स युनिव्हर्सची पहिली फिल्म 'सुपर कमांडो ध्रुव' वर आधारित असेल. याची अधिकृत घोषणा जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. फिल्मचे चित्रीकरण फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू होईल आणि ती त्याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
आर्यनने मिटवला 'गुप्ता बंधूं'मधील वाद
आर्यन खानच्या या प्रोजेक्टची सर्वात मोठी बातमी ही आहे की, त्याने राज कॉमिक्सच्या मालकांमध्ये असलेला वर्षानुवर्षाचा वाद मिटवला आहे. या कॉमिक्सवर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेक चित्रपट निर्मात्यांनी केला, पण राज कॉमिक्सचे मालक संजय आणि मनोज गुप्ता यांच्यातील वादामुळे ते शक्य झाले नव्हते. दोन्ही भाऊ 'राज कॉमिक्स'चे मालक असल्याने कायदेशीर गुंतागुंत होती.
परंतु, व्हायरल पोस्टमध्ये दावा केला आहे की, आर्यन खानने या दोन बंधूंना एकत्र आणलं आहे. ही डील संजय गुप्ता यांच्यासोबत झाली असली तरी, दुसरे बंधू मनोज गुप्ता यांनीही चित्रपटांच्या 'IP राइट्स'वर स्वाक्षरी केली असून, त्यांचे नाव चित्रपटाचे 'को-प्रोड्यूसर' म्हणून सूचीबद्ध केले जाईल.
चाहत्यांच्या उत्साहाला आलंय उधाण
लहानपणापासून राज कॉमिक्स वाचलेल्या चाहत्यांसाठी ही बातमी 'स्वप्न सत्यात उतरण्यासारखी' आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, "वाह! मी लहानपणी राज कॉमिक्सचा खूप मोठा चाहता होतो आणि मला नेहमीच ध्रुव, डोगा आणि नागराजवर चित्रपट हवा होता. हे तर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे!" आर्यन खानचा हा नवीन प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास, तो भारतीय सुपरहिरो सिनेसृष्टीत एक नवा इतिहास घडवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
