हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात आपल्या जादुई शब्दांनी प्रेमाची भावना फुलवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वानंद किरकिरे यांचे वडील, श्री चिंतामणी किरकिरे यांचे निधन झाले आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहून ही माहिती चाहत्यांना दिली आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
advertisement
'छन्नू भैया' आता नाहीत
गीतकार, गायक आणि अभिनेता अशा विविध भूमिकांमधून स्वानंद किरकिरे यांनी आपली कला सिद्ध केली आहे. त्यांच्या वडिलांना बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी 'काका' आणि संगीत क्षेत्रातील लोक 'छन्नू भैया' म्हणून ओळखत असत.
स्वानंद यांनी वडिलांच्या निधनाची बातमी देताना लिहिले, "माझे वडील श्री चिंतामणी किरकिरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे काका (सी सी किरकिरे) आणि संपूर्ण संगीत जगताचे छन्नू भैया आज आम्हाला सोडून कायमचे निघून गेले आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि शक्य झाल्यास, एखादे गाणे गुणगुणा." स्वानंद यांच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कला आणि अभिनयाचा वारसा
स्वानंद किरकिरे यांचा जन्म २९ एप्रिल १९७२ रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील चिंतामणी आणि आई नीलांबरी दोघेही शास्त्रीय गायक होते. कॉमर्समध्ये पदवी घेतल्यानंतर, अभिनयाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते दिल्लीला आले आणि १९९६ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला. येथूनच त्यांच्या अभिनय आणि नाट्यकलेची मजबूत पायाभरणी झाली.
'हजारों ख्वाहिशें ऐसी'मधील 'बावरा मन देखने चला एक सपना' या गाण्यामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. 'लगे रहो मुन्ना भाई' या सिनेमातील बंदे में था दम आणि 'थ्री इडियट्स'मधील बहती हवा सा था वो या गाण्यांसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. तसेच, 'चुंबक' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
