दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दशावतारमधील मत्स्य अवतारातील शूटींगवेळचे व्हिडीओ फोटो शेअर केलेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी तो सीन कसा शूट केला हे पाहायला मिळतंय. हे फोटो शेअर करत त्यांनी फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "दशावतारातील ‘मत्स्यावतार’, एक दिव्य! 'दशावतार' चित्रपटातला माझा सगळ्यात गाजत असलेला अवतार म्हणजे, ‘मत्स्यावतार’! निळ्या रंगातील चमकदार रंगभूषा आणि वेशभूषा… त्यासाठी सगळ्या टिमने तासंतास घेतलेले कष्ट… कुडकुडत्या थंडीत पाण्याखाली जाऊन केलेले चित्रीकरण आणि त्या साऱ्याचे फलित म्हणजे चित्रपटगृहात प्रेक्षकांनी 'मत्स्यावताराच्या' प्रसंगाला दिलेली दाद"
advertisement
दिलीप प्रभावळकर यांनी पोस्टच्या शेवटी सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलंय, "अजूनही तुम्ही ‘दशावतार’ पाहिला नसाल तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो नक्की पहा. चुकवू नये असं काहितरी सिनेमागृहात पाचव्या आठवड्यातही सुरु आहे."
दशावतार सिनेमाचं शूटींग कोकणातील गर्द जंगले, तलाव आणि दुर्गम ठिकाणी करण्यात आलं आहे. विविध प्रकारच्या वेशभूषा, आव्हानात्मक लोकेशन्सवर शूट करण्यात आलं. या काळात त्यांना चिकनगुनिया सारखा वेदनादायी आजार झाला होता. या साऱ्या अडथळ्यांवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भूमिकेला, कथेला न्याय देण्याची प्रामाणिकता यामुळेच दिलीप प्रभावळकर यांनी हे सर्व सक्षमपणे पार पाडले आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्या या सीन्सविषयी बोलताना दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले होते की, "आम्ही त्यांच्या वयाचा विचार करून बॉडी डबल ठेवण्याची तयारी केली होती. सेटवर बॉडी डबल सदैव उपस्थितही होते. मात्र प्रभावळकरांनी ‘ॲक्शन सीन्स नैसर्गिक वाटावेत’ म्हणून ते मीच करणार’, असं ठाम सांगितलं आणि ते प्रत्यक्षात करूनही दाखवलं."
दशावतार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. चौथ्या आठवड्यातही दशावतारचे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो सुरू आहेत.