मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी प्रमुख डी. शिवानंदन हे महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) देखील आहेत. त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या पुस्तकाचा हवाला देत इंडियन एक्सप्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे की, हेमंत करकरे यांना मिळालेल्या टीप ऑफमुळे पोलिसांच्या मनात एका हॉटेलमध्ये करन्सी एक्सचेंज होत असल्याबाबत शंका निर्माण झाली. काही लोकांना अटक केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. डी. शिवानंदन यांनी या ऑपरेशनचं नेतृत्व केलं होतं.
advertisement
( "नेहरूंच्या काळात खूप मोठी चूक झाली..."; दिग्दर्शक प्रकाश झा यांचा तो व्हिडीओ चर्चेत )
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे टार्गेट होते का?
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या छाप्यात ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, त्या ठिकाणावरून 'मातोश्री'चा नकाशाही जप्त करण्यात आला होता. मातोश्री हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान होतं. आजही शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे याच ठिकाणी राहतात. आपल्या पुस्तकात डी. शिवानंदन म्हणतात, "बशीरबागमधील छापा इतका बेमालुमपणे पार पडला की दहशतवाद्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी एक क्षणही मिळाला नाही. संपूर्ण टीमने गरुडाप्रमाणे त्यांच्यावर हल्ला केला. काही वेळातच दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती."
दहशतवाद्यांच्या खोलीत सापडली होती शस्त्रे आणि दारूगोळा
पुस्तकातील माहितीनुसार, रफिक मोहम्मद (वय 34 वर्षे), अब्दुल लतीफ अदानी पटेल (वय 34 वर्षे), मुस्ताक अहमद आझमी (वय 45 वर्षे), मोहम्मद आसिफ ऊर्फ बबलू (वय 25 वर्षे), गोपाल सिंग बहादूर मान (वय 38 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांची नावं होती. त्यांच्याकडून दोन एके-56 असॉल्ट रायफल, पाच हँडग्रेनेड, अँटी-टँक टीएनटी रॉकेट लाँचर, शेल आणि तीन डिटोनेटर्स, स्फोटके, सहा पिस्तूल, दारूगोळा आणि 1,72,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. या दहशतवाद्यांनी मुंबईत मोठा हल्ला करण्याची योजना आखली होती, असं वाटत होतं.
एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी माहितीनुसार, "24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून नवी दिल्लीला जाणारं इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट IC814 नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत हायजॅक झालं होतं. अधिकाऱ्यांना अपहरणाची माहिती मिळताच देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. त्या काळात मी मुंबई पोलिसात सहपोलीस आयुक्त म्हणून तैनात होतो आणि मुंबई गुन्हे शाखेचा प्रमुख होतो. माझे बॉस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त आर. एच. मेंडोंका यांनी मला या घटनेची माहिती दिली आणि संपूर्ण गुन्हे शाखेला हाय अलर्टवर ठेवण्यास सांगितलं. आम्ही सर्वजण श्वास रोखून घडामोडींवर लक्ष ठेवून होतो."
हेमंत करकरेंनी अचानक येऊन दिला आश्चर्यचा धक्का
"अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसचा दिवस होता. मी क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील माझ्या कार्यालयात होतो. तेव्हा सकाळी 11 च्या सुमारास एक अनपेक्षित पाहुणा माझ्याकडे आला. हा पाहुणा म्हणजे, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी हेमंत करकरे होते. ते त्यावेळी रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या (RAW) मुंबई कार्यालयात नियुक्त होते. मला लगेच लक्षात आलं की, ही काही सामान्य भेट नव्हती. हेमंत करकरे यांनी मला सांगितलं की रॉने एक फोन नंबर मिळवला आहे. तो नंबर मुंबईत होता आणि तो पाकिस्तानमधील फोन नंबरच्या सतत संपर्कात आहे. त्यांनी मला तो फोन नंबर दिला आणि मी लगेच कामाला लागलो..."
पुस्तकातील एक उताऱ्यानुसार, तत्काळ टीम्स तयार करून काम सुरू झालं. एक टीम मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरकडे पाठवण्यात आली जेणेकरून कॉलरचे तपशील, कॉल लॉग इत्यादी माहिती मिळवता येईल. दुसऱ्या टीमने मोबाईल क्रमांकावर चोवीस तास लक्ष ठेवलं. मोबाईल टॉवर सिग्नलनुसार, जुहू ते मालाड दरम्यान हा क्रमांक वापरला जात असल्याचं आढळलं. पण, ही माहिती पुरेशी नव्हती. कारण मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात जुहू आणि मालाड दरम्यान लाखो लोक राहतात… 1999 मध्ये अगदी तंत्रज्ञानाही मर्यादित होतं. पहिल्या तीन दिवसांत काहीच साध्य झालं नाही आणि अधिकारी निराश होऊ लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकार वेळ वाया घालवत होतं. माहिती एवढीच होती की, फोनवरील संभाषण ऐकणाऱ्या टीमला गुरांचे आवाजही ऐकू येत होते. मशिदीजवळील अशा प्रत्येक ठिकाणाची तपासणी करण्यात आली परंतु काही उपयोग झाला नाही.
एका फोन कॉलनंतर पहिला क्लू सापडला….
शिवानंद यांच्या म्हणण्यानुसार, "28 डिसेंबर 1999 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक आशेचा किरण दिसला. सर्व्हिलन्स पथकाला त्यांच्या सिस्टीमवर फोन सक्रिय असल्याचा अलर्ट मिळाला. आम्ही लगेच कॉल्स ऐकायला आणि रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मुंबईतील रहिवासी असलेल्या कॉलरने त्याच्या पाकिस्तानातील हँडलरला फोन केला होता. त्याच्याकडे असलेली रोख रक्कम संपली आहे आणि त्याला त्वरित पैशांची गरज आहे, असं तो सांगत होता. दुसऱ्या बाजूच्या कॉलरने त्याला 30 मिनिटे थांबण्यास सांगितलं. मला माहीत होतं की, आम्हाला क्लू मिळाला आहे. मी रेकॉर्डिंग रूममधील प्रत्येकाला हाय अलर्टवर राहण्याची आणि पुढील फोन कॉलचा प्रत्येक शब्द रेकॉर्ड करण्याची सूचना केली. पुढचा कॉल 45 मिनिटांनी आला."
कॉल करणारा होता जैश-ए-मोहम्मदचा (JeM) दहशतवादी
फोन करणारी पाकिस्तानमधील व्यक्ती जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होती. त्याने मुंबईत उपस्थित असलेल्या व्यक्तीला त्याचा ठावठिकाणा विचारला असता तो मुंबईतील वायव्य भागातील जोगेश्वरी (पूर्व) येथे कुठेतरी राहत असल्याचं समजलं. जैशच्या दहशतवाद्याने मुंबईतील त्याच्या साथीदाराला सांगितलं की, त्याने एक लाख रुपयांची व्यवस्था केली आहे, जी हवालाद्वारे त्याच्यापर्यंत पाठवली जाईल. रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील शालिमार हॉटेलमध्ये निळी जीन्स आणि पट्टे असलेला शर्ट घातलेली एक व्यक्ती त्याला पैसे देईल. या माहितीवरून सहा पथकं त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. पोलिसांना मिळालेली माहिती बरोबर होती. निळी जीन्स आणि पट्टे असलेला शर्ट घातलेली एक व्यक्ती तिथे आली होती. पैसे घेणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करावा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. जेव्हा तो माणूस टॅक्सीतून निघून गेला तेव्हा त्याचा पाठलाग केला गेला. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून ते जोगेश्वरी येथे तो उतरेपर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला. ऑटोरिक्षाने तो जोगेश्वरी (पश्चिम) येथील बशीरबाग परिसरात पोहोचला असता पोलीस पथकांनी तिथे छापा टाकला.