इतका वेदनादायक अपघात कधीच पाहिला नाही!
विजय यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. घटनेतील मृतांबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि त्यांचे मन चिंतेने भरले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात कधीही इतका वेदनादायक अपघात किंवा इतकी दुःखद परिस्थिती पाहिली नाही.” परिस्थिती अजून असामान्य होऊ नये, म्हणून त्यांनी तातडीने करूरचा दौरा टाळला असून, लवकरच ते पीडित आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
advertisement
बदलाच घ्यायचा असेल, तर...
विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून त्यांना अटक केल्याबद्दल तामिळनाडूतील एम. के. स्टालिन यांच्या सरकारला थेट आव्हान दिले. ते मुख्यमंत्री स्टालिन यांना उद्देशून म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, जर तुम्ही बदला घेण्याचा विचार केला असेल, तर तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकता, पण माझ्या पक्षाच्या लोकांना तुम्ही हात लावू शकत नाही!”
त्यांनी दावा केला की, घटनेच्या दिवशी लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊनच ते करूरमधून लवकर बाहेर पडले होते. घटनेचे सत्य लवकरच समोर येईल आणि कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी ते तयार आहेत, असेही त्यांनी संकेत दिले.
दोन पदाधिकाऱ्यांना न्यायिक कोठडी
दरम्यान, या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात टीव्हीकेचे दोन पदाधिकारी वी. पी. मथियालगन आणि कासी पौनराज यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे. पक्षाचे महासचिव बस्सी आनंद आणि उप-महासचिव निर्मल कुमार यांच्यावरही एफआयआर दाखल आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय आयोग नेमला आहे.