अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या सिनेमाचं शूटींग झालं त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर लाँच करण्यात आला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' या सिनेमात बंद होत असलेल्या मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना अनेक वर्षांनंतर त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहातात. या पुनर्भेटीत ते आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षणांना पुन्हा एकदा जगतात.
हा ट्रेलर नॉस्टॅल्जियाने भरलेला असून तो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडत आहे. तसेच हा ट्रेलर मजेशीर, नॉस्टॅल्जिक असतानाच आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील विषयावर नेमके बोट ठेवताना दिसतो. मराठी शाळा बंद पडण्याच्या चर्चेत असताना हा मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे आणि मराठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा 1 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसंत प्राजक्ता कोळी पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत यांचीही झलक पाहायला मिळाली. आता त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फोक आख्यानचे संगीतकारभारी हर्ष- विजय आणि ईश्वर अंधारे यांनी सिनेमाची गाणी आणि संगीत केलं आहे. फोक आख्यानच्या त्रीमूर्तींच्या संगीताचा आविष्कार सिनेमात पाहायला मिळणार आहे.
