हायकोर्टाचा हिरवा कंदील, पण रस्त्यावर विरोध
'मनाचे श्लोक' या शीर्षकामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या जात आहेत, असा आरोप करत हिंदु जनजागृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पवित्र नावाचा वापर करून लिव्ह-इन संबंधांवर आधारित चित्रपट बनवणे हा समर्थ रामदास स्वामींचा अपमान आहे, अशी त्यांची भूमिका होती. या याचिकेवर सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले. चित्रपट प्रदर्शित करण्याचा न्यायालयाचा निर्णय 'मनाचे श्लोक' टीमने प्रसिद्धीपत्रक काढून स्वागत केला.
advertisement
पुण्यात हिंदू संघटनेचा धडक मोर्चा!
न्यायालयाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असला तरी, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध काही थांबलेला नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून असलेल्या आक्षेपामुळे, गुरुवारी संध्याकाळी पुण्यात कोथरूड येथील एका थिएटरमध्ये 'मनाचे श्लोक'चा प्रिमीयर शो सुरू होताच, हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये धडक मारली. त्यांनी थेट चित्रपट निर्मात्यांवर हल्लाबोल करत हा शो जबरदस्तीने बंद पाडला. लिव्ह-इन रिलेशनवरच्या सिनेमाला 'मनाचे श्लोक' हे नाव देऊन समर्थ रामदास स्वामींचा अपमान केला जात आहे, अशी संतप्त भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर, आज पुण्यातील या चित्रपटाचे सर्व शो बंद पाडण्यात आले आहेत.
संस्कृती विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य
एकीकडे उच्च न्यायालय चित्रपटाच्या बाजूने उभे राहिले आहे, तर दुसरीकडे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. 'मनाचे श्लोक' या शीर्षकावरून निर्माण झालेला हा वाद अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक आदर यांच्यातील संघर्षाला अधोरेखित करतो. आता गोंधळ आणि न्यायालयीन लढाईतून मार्ग काढत हा चित्रपट महाराष्ट्रात पूर्णपणे प्रदर्शित होतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.