महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतने नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर पूजा कधी लग्न करतेय याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली होती. पूजाच्या हळदी, मेहंदी आणि साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज आता पूजा लग्नबंधनात अडकली. पूजाच्या लग्नाला सिनेसृष्टीतील पूजाच्या जवळच्या मंडळींनी हजेरी लावली होती.
advertisement
Anchal Tiwari : 'पंचायत 2' फेम अभिनेत्री जिवंत! अपघातात जीव गमावल्याच्या बातमीवर सोडलं मौन
समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये नववधूच्या रूपात पूजा खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाचा शालू नेसला असून, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र अशा लूकमध्ये तिनं सर्वांचंच लक्ष वेधलं. तर, पूजाचा नवरा सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. हे जोडपं लग्नानंतर खूपच खुश आणि आनंदी दिसत असून आता पूजाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाला पूजाचे बेस्ट फ्रेंड्स आणि कलाकार प्रार्थना बेहेरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, अभिजित आणि सुखदा खांडकेकर हे हजर होते. सोबतच मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर या सगळ्यांनी खास उपस्थिती लावली होती.
पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं.पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. आता पूजाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर झाले आहेत.
पूजा सावंतने तिच्या लव्हस्टोरीविषयी खुलासा केला होता. एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना ती म्हणाली, “माझी लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या पटकन गोष्टी जुळून येतील. आम्ही दोघंही अरेंज मॅरेज पद्धतीत पहिल्यांदा भेटलो. त्याचं स्थळ माझ्यासाठी आईच्या मैत्रिणीने आणलं होतं. पहिल्यांदा मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला तेव्हाच मला तो आवडला होता. त्यामुळे आईच्या सांगण्यावरून मी त्याला सर्वात आधी फोन केला. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. पूजा सावंत पुढे म्हणाली, 'आमचं बोलणं सुरू झाल्यावर आम्ही बराच वेळ घेतला. आम्ही दोघंही एकमेकांच्या हळुहळू प्रेमात पडलो. अशातच एक असा दिवस आलं जेव्हा मनापासून वाटलं…याच मुलाशी आपण लग्न केलं पाहिजे. अशी आमची साधी सुंदर लव्हस्टोरी आहे.' असं तिने सांगितलं होतं.