‘फुलवंती’ या चित्रपटामुळे सध्या प्रकाशझोतात असलेल्या प्राजक्ताने नुकताच 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेचा ‘संयम 2’ हा विशेष ध्यान व साधनेसंबंधी कोर्स पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, हा तिचा या संस्थेतील दुसरा कोर्स असून, यापूर्वीही तिने 'सुदर्शन क्रिया' संबंधित प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
प्राजक्ताने स्वतःच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याची माहिती दिली आहे. बेंगळुरूच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमात खुद्द श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या चार दिवसांच्या कोर्समध्ये 3000 हून अधिक अॅडव्हान्स लेव्हल ध्यान करणारे साधक सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात प्राजक्तानेही सहभाग घेतला आणि या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करत एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यात ती गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यासोबत दिसत आहे.
advertisement
तिने फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताने लिहिलं, “खूप आनंद होतोय हे सांगताना की, मला आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या (Art of Living Foundation) बेंगळुरू आश्रमात, गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या उपस्थितीत 'संयम 2' कोर्स करण्याची संधी मिळाली. या कोर्समध्ये 3000 हून अधिक ॲडव्हान्स लेव्हलच्या ध्यानधारकांसोबत मी सहभागी झाले. आयुष्यासाठीचे अनेक महत्त्वाचे 'सूत्र' मला इथे मिळाले.”
प्राजक्ताने पुढे असेही सांगितले की, “या कोर्समुळे केवळ शरीर नव्हे तर मनालाही शांती मिळते. साधना, मौन, प्राणायाम आणि ध्यान यांचा सखोल अभ्यास करणे म्हणजे एक नव्याने स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे.”
आश्रमातील तिचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे. “खऱ्या अर्थाने प्रेरणादायी”, “फक्त सुंदर नव्हे, तर आध्यात्मिकही”, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी तिचा इंस्टा पोस्ट भरून गेला आहे.