महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा टिझर नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.
advertisement
( जीम ट्रेनरचं झाला जावई, मुलगी देण्याआधी मराठमोळ्या नुपूरला आमिरने विचारला होता तो एकच प्रश्न )
"सोसायटीचा का रुल है, घाटी लोगो को फ्लॅट नही देते हम" म्हणणाऱ्याला "घाटी म्हणजे माहितीयेत कोण?" म्हणत मराठी माणसाची ताकद आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची गर्जना आणि त्याची छोटी झलक या टीझरमध्ये पाहायला मिळतेय.
सिनेमाची स्टारकास्ट
या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेता विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महेश मांजरेकर काय म्हणाले?
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, "माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे."
आपल्या भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थ बोडके म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडू शकेन, असा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेसाठी आपण अभ्यास करतोच, परंतु या चित्रपटातील माझा प्रवास विशेष होता."
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' रिलीज डेट
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.