पूजाने सांगितली पती शिरीषच्या मृत्यूची कहाणी
शिरीष गवसची पत्नी पूजा गवस हिने चाहत्यांशी संवाद साधत ही घटना उलगडली. पूजाने सांगितल्यानुसार, मार्चमध्ये सर्दी, डोकेदुखी सुरू झाली. तपासणी केली असता त्याला सायनसचा त्रास असल्याचं लक्षात आलं. औषधं सुरू असताना त्याला मे महिन्यात किडनीमध्ये ११mm चा स्टोन असल्याचं लक्षात आलं, त्यानुसार डॉक्टरांनी त्याला सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सर्जरीनंतर शिरिष ठणठणीत झाला, त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी सुरू केली. मुंबईहून आल्यानंतर सर्जरीमध्ये घालण्यात आलेला स्टेंट काढण्यासाठी डॉक्टरांनी बोलावून घेतलं. मृत्यूच्या १५ दिवस आधी त्याला उलट्या आणि पित्ताचा त्रास सुरू झाला. त्याला चक्कर येऊ लागल्या, पोटात अन्नपाणी टिकत नव्हतं. अचानक तब्येत बिघडल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले गेले. याच दरम्यान त्याला पहिल्यांदा फीट आली. यानंतर त्याला तात्काळ गोव्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
advertisement
ब्रेन ट्युमरचा भयानक रिपोर्ट आणि कोमा!
न्यूरोसर्जनकडून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी काही तासांच्या फरकाने शिरिषला फीट्स येतच होत्या. घरातील बहुतांश मंडळी डॉक्टर असल्याने त्यांनी कोणताही वेळ न घालवता शिरिषची सीटी ब्रेन ही टेस्ट केली. त्याचवेळी शिरिषच्या फीट्सचा त्रास वाढला आणि तो बेशुद्ध झाला. टेस्टच्या रिपोर्ट्सनुसार शिरिषच्या मेंदूमध्ये गाठ आहे आणि त्यात पाणी भरलेलं असल्याचं मेंदूच्या डॉक्टरांनी सांगितलं. गोवा ते मुंबई असा प्रवास शक्य नसल्याने शिरिषला गोवाच्या जीएमसी बंबोळी येथे हलवण्यात आले. पश्चिम पट्ट्यातील सर्वोत्कृष्ट न्यूरोसर्जन तिथेच होते. अवघ्या दोन-तीन तासांमध्येच शिरिष कोमामध्ये गेला होता. त्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याच्या मेंदूत जमलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. त्याची परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारली असली तरीही त्याला अद्याप शुद्ध आली नव्हती.
अधूरे ट्युमरचे ऑपरेशन आणि इन्फेक्शन
अथक सहा तासांच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूतून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या. दोन दिवसांनी शिरिष शुद्धीवर आला. तीन-चार दिवसांनी त्याची प्रकृती सुधारल्यावर ट्यूमरचं ऑपरेशन करायचं ठरलं. यात खूप रिस्क होती. सात-आठ तासांच्या सर्जरीनंतर शिरिषच्या मेंदूमधील ट्यूमर काही अंशी काढण्यात डॉक्टरांना यश आले. पण हा ट्यूमर मेंदूच्या अत्यंत नाजूक भागात होता. तो पूर्णपणे काढता येणं शक्य नव्हतं. यात जराही धक्का बसला असता तर शिरिषच्या जीवाला धोका होता. डॉक्टरांना केवळ २०-३० टक्के भाग काढता आला. कारण सर्जरीमध्ये जरा धक्का बसला असता तर शिरिषला मेमरी लॉस, चालण्या-बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम इत्यादी समस्या जाणवल्या असत्या. ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो ही भीती होती.
दोन-तीन दिवसांनी शिरिषची प्रकृती सुधारायला लागली. औषधे आणि व्यायामाला शिरिष चांगला प्रतिसाद देत होता. हळूहळू तो ठीक व्हायला लागला होता. पण अचानक ४-५ दिवसांनी त्याला ताप येऊ लागला. त्यानंतर लगेचच अनेक टेस्ट्स केल्या. तर त्याच्या लघवीमध्ये आणि मेंदूच्या पाण्यामध्ये इन्फेक्शन झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याला पुन्हा आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. शेवटी ५ दिवसांनी शिरिष सर्वांना सोडून गेला. शिरिषच्या रिपोर्ट्समधून असं दिसून आलं की शिरिषला लहानपणापासूनच हा ट्यूमर होता. पण ट्यूमरची पूर्णपणे वाढ झाली नसल्याने त्याची लक्षणे तेव्हा दिसली नव्हती.
शेवटी पूजाने सांगितले की, "अंथरुणाला खिळून राहणं शिरीषच्या नशिबात नव्हतं, म्हणूनच तो हसत खेळत आमच्यातून निघून गेला."