ज्यांच्या आयुष्यात स्त्रियांना अजिबात स्थान नाही त्यांच्या आयुष्यात जर एका स्त्रीची एंट्री झाली तर? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या टीझरमध्ये नेमकं हेच पाहायला मिळतंय. कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात कामिनीची एन्ट्री झाली आहे. ही कामिनी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे. पहिल्या सिनेमात अमृता खानविलकर, सुकन्या मोने, सुजाता जोशी या अभिनेत्री होत्या. पण सीक्वेलमध्ये थेट यांच्याऐवजी रिंकूनं हजेरी लावली आहे. टीझरमध्ये कुठेच अमृताची झलक पाहायला मिळत नाहीये.
advertisement
( 'क्रांतिज्योती'ची मुले बॉक्स ऑफिसच्या परीक्षेत अव्वल! पहिल्याच विकेंडला बजेट वसूल, किती केली कमाई? )
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये असंच काहीस पाहायला मिळतंय. रतन, मदन, चंदन व बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री झाली आहे. यांच्या आयुष्यात कामिनीच्या येण्याने काय घडेल, हे पाहाणे अतिशय रंजक ठरणार आहे. कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोद यांची धमाल झलक टीझरमध्ये दिसतेय.
कामिनीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू या चित्रपटातून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील झाली आहे. शिस्तप्रिय भावंडांमध्ये बिनधास्त कामिनीची एंट्री होणं म्हणजे डबल गोंधळ, डबल विनोद! कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस स्वभाव असलेला चंदन या भिन्न स्वभावांच्या भावांसोबत आणि खट्याळ बबन बरोबर तिची केमिस्ट्री कशी जमेल? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
सिनेमाविषयी बोलताना रिंकू म्हणाली, "पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या मोठ्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान असलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.”
या सिनेमाचं दिग्दर्शन अंकुश चौधरीने केलं आहे. सिनेमाची कथा देखील त्यानेच लिहिली आहे. सिनेमात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 30 जानेवारीला रिलीज होणार आहे.
