अंत्यसंस्कारस्थळी उपस्थित असताना आनंद शिंदे म्हणाले, "मला आता काही सुचत नाहीये. इतकी गर्दी आहे की मीसुद्धा आतमध्ये जाऊ शकलो नाही. हीच खेदाची गोष्ट आहे की इथे येऊन दादांना फक्त लांबून पाहिलं. त्यांचं दर्शन घेणंही शक्य झालं नाही."
advertisement
आनंद शिंदे आणि अजित पवार यांचे अनेक वर्षांचे चांगले आणि मैत्रीपूर्ण संंबंध होते. अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. आनंद शिंदे म्हणाले, "ज्या दादांसोबत मी बसलो, उठलो... कुणाचं काही काम असलं की मी डायरेक्ट दादांना फोन करायचो. ते नेहमी म्हणायचे, 'ए शिंदेंना घेऊया. पण आज दादाच तिथे नाहीत म्हटल्यावर मला कोण फोन करून आतमध्ये घेणार?"
राजकीय असो सामाजिक किंवा कलाविश्वात दादा सगळ्यांचे प्रिय होते. दादांचा लाडका अभिनेता सूरज चव्हाणही शेवटचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. मात्र त्यालाही दादांना पाहता आलं नाही. सूरजनं दादांच्या जळच्या चितेसमोर डोकं टेकवलं.
बारामतीमध्ये अजित पवारांसाठी आज लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. प्रत्येकासाठी आपुलकीनं फोन उचलणारे, कामात मदत करणारे आणि माणसांशी नातं जपणाऱ्या दादांना निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे.
