'मागे वळून पाहिलं तर दादा', अजित पवारांना पाहून भारावली होती हेमांगी कवी; फक्त चक्कर यायची बाकी होती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अजित पवार यांच्या आठवणीत हेमांगी कवीने भावुक किस्सा सांगितला. हेमांगी एकदा अजित दादांना पाहून भारावून गेली होती.
दिवंगत नेते अजित पवार म्हणजे केवळ मोठा राजकीय नेता नव्हते तर माणसांतला माणूस होता. लोकांशी थेट जोडलेला, नावं-गावं लक्षात ठेवणारा आणि तळागळातल्या माणसांशी आपुलकीनं वागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या वैशिष्ट्यांची किततरी उदाहरण समोर आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आज त्यांच्या आठवणीत अश्रू ढाळत आहेत. अजित पवारांना पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री हेमांगी कवी अजित दादांना पाहून भारावली होती. तिला फक्त चक्कर यायची बाकी होती. नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्री हेमांगी कवीनं अजित दादांच्या आठवणीतला एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.
हेमांगी कवीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "10 वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतर नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हां कलाकारांना ग्रुप फोटोसाठी स्टेजवर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे प्रोटोकॉल सांभाळून फोटो काढले जात होते. पण स्टेजवर ही गर्दी झाली."
advertisement
"ग्रुप फोटोमध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार फोटोसाठी लाइनमध्ये पुढे उभे राहीलो, आमच्या मागे VIPs. तेवढ्यात मागून आवाज आला "काय कवी" मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते. मी दचकून म्हणाले "Sir तुम्ही?" मला त्यांना विचारयचं होतं "तुम्हांला माझं नाव कसं माहीत?" हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले "अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?" मी हसून नाही म्हटलं. मी फक्त नावाची कवी आहे"
advertisement
हेमांगीनं पुढे लिहिलंय, "त्यावर त्यांनी विचारलं "आडनाव कवी कसं काय" मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं. बरं समोर फोटो काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं "तुम्ही पुण्याच्या का?" मी 'नाही' बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… "अरे त्या माण तालुक्याच्या आहेत…जयकुमार गोरेच्या गावच्या!" हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी फोटोबिटो सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानशी स्माइल देत सगळ्यांसोबत फोटो काढत होते. फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हां सगळ्यांना त्यांच्या विशेष स्टाइलमध्ये लेफ्ट हातात काळं घड्याळ घातलेल्या हातानं शार्प असा नमस्कार करत ‘चला’ म्हणत तरतर निघून गेले."
advertisement
advertisement
"घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली. मी म्हटलं एवढा मोठा, व्यस्त माणूस माझ्या सारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो, पप्पा? मी कुठली याचे डिटेल्स ही त्यांना कसे माहीत आहेत. त्यावर बाबा म्हणाले "चांगला नेता कायम तळागळ्यातल्या लोकांशी हा असा आपला कॉन्टॅक्ट ठेवतो. नावं, डिटेल्स लक्षात ठेवतो. त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखीच त्यांची मेमरी शार्प आहे. मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण."
advertisement
हेमांगीनं शेवटी लिहिलंय, "त्या कार्यक्रमानंतर मला अजितदादा कधी कुठे दिसले, भेटले की त्यांच्या मिश्किल स्माइलने "काय कवी" म्हणून हाक मारायचे. काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते “काय कवी” माझ्या कानात घुमत आहे. Not done दादा, not done"
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 5:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मागे वळून पाहिलं तर दादा', अजित पवारांना पाहून भारावली होती हेमांगी कवी; फक्त चक्कर यायची बाकी होती









