सुप्रिया यांचा जन्म मुंबईतील अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला होता. तरीही त्यांचं बालपण खूप कष्ट आणि संघर्षात गेलं. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'माझं बालपण खूप कष्टाचं होतं. मी खूप श्रीमंत कुटूंबात जन्माला आले. माझ्या आजोबांचा कारखाना होता. माझी आजी त्यावेळी नऊवारी नेसून डर्बी खेळायची. पण नंतर काही गोष्टी घडल्या आणि आम्ही गरीब झालो. सगळं ऐश्वर्य गेलं आणि खूप हलाखीची परिस्थिती आली.'
advertisement
'मला माझ्या मुख्याध्यापकांनी दत्तक घेतलं होतं. माझी आई कधीच शिकू शकली नाही त्यामुळे तिने आम्हाला शिकायला प्रोत्साहन दिलं. तिने तिचा संसार उत्तम पेलला. लोक गरिबीतून श्रीमंतीकडे जातात ना त्याचा त्रास नाही होत पण श्रीमंतीतून गरिबीत येतात ना तेव्हा त्याचा त्रास होतो. आमच्या बाबांचं सगळं ऐश्वर्य गेल्यानंतर आईने कंबर कसून काम केलं. माझी आई अठरा घरी गरोदर बायकांना मालिश करतात ते काम ती करायची. अजून 18-20 घरची ती धुणीभांड्याची कामं करायची.' असा खुलासा सुप्रिया यांनी केला आहे.
'शाळेत असताना मी एका जवळच्या मैत्रिणीच्या घरी मी घरकाम करायचे, भांडी घासायचे. तिच्या आईने निकाल लागल्यावर मला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले होते. त्यावेळी माझा पगार शंभर रुपये होता.' अशी आठवण देखील सुप्रिया यांनी सांगितली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, 'शाळा संपल्यावर हळुहळू मी नाटकाकडे वळले तेव्हा मला प्रयोगासाठी पहिल्यांदा १५० रुपये मिळाले होते. ती माझी पहिली कमाई होती. गणपतीचे दिवस असल्याने बरेच प्रयोग झाले आणि माझ्या हातात पहिल्यांदाच सातशे ते आठशे रुपये आले. त्यावेळी ते पैसे खूप वाटायचे आणि आईला मी पाचशे रुपये दिले होते. आईचं नेहमी म्हणणं नोकरी कर, लग्न कर असंच होतं. पण, मी काहीतरी वेगळं करावं अशी माझ्या बाबांची इच्छा होती.' असा खुलासा सुप्रिया यांनी केला आहे. आता सुप्रिया यांचे दिवस पुन्हा पालटले आहेत. त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं.