'झनक झनक पायल बाजे'च्या नृत्यवैभवापासून 'दो आंखें बारह हाथ'च्या सामाजिक विचारांपर्यंत, 'अमृतमंथन'च्या तांत्रिक क्रांतीपासून 'नागरिक'च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच आहे. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे.
advertisement
‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमात व्ही.शांताराम यांची प्रमुख भुमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सिनेमाच्या पोस्टरमधील अभिनेता कोण? हा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी असून तो व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थ चतुर्वेदीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ही भुमिका गेम चेंजर ठरणार आहे.
'आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर' च्या जमदार यशानंतर अभिजीत शिरीष देशपांडे या सिनेमाचं दिग्दर्शन, लेखन करत आहेत. सिनेमाविषयी बोलताना ते म्हणाले, "व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची चर्चा होत नाही, तर भारतीय चित्रपटाची संपूर्ण तत्त्वज्ञानपर परंपरा डोळ्यांसमोर उभी राहाते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची निष्ठा, प्रयोगांची भीती न बाळगता कलाप्रवाहात झेप घेण्याची त्यांची हिंमत हे सर्व पडद्यावर साकारताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हाच माझा प्रयत्न आहे."
सिनेमाची निर्मिती व्ही. शांताराम यांचे नातू राहुल किरण शांताराम यांनी केली आहे. सिनेमाविषयी बोलताना हे म्हणाले "हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी केवळ प्रोजेक्ट नसून ती एक भावना आहे. हा चित्रपट म्हणजे आमच्या सर्वांकडून आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली भव्य श्रद्धांजली आहे. व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला दिलेले योगदान किती अपरिमित आहे, हे आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा आमच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या जीवनातील तेज, त्यांची दृष्टी, त्यांची धडपड हे सर्व जगाने पुन्हा अनुभवावे, म्हणून हा चित्रपट आम्ही अत्यंत भव्यतेने, तांत्रिक उत्कृष्टतेने आणि संवेदनशीलतेने साकारत आहोत." व्ही. शांताराम हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
