नसीरुद्दीन शाह यांच्या चित्रपटात 'तो' छोटा रोल
फराह खानने १९८६ मध्ये नसीरुद्दीन शाह आणि अर्चना पूरन सिंह यांच्या 'जलवा' चित्रपटातून आपल्या करियरचे पहिले पाऊल टाकले. या चित्रपटातील 'फीलिंग हॉट हॉट हॉट' या गाण्यामध्ये फराहने अर्चना पूरन सिंह यांच्यासोबत एका बॅकग्राउंड डान्सरची छोटी भूमिका साकारली होती. तो क्षण फराहच्या प्रवासाचा टर्निंग पॉईंट ठरला.
advertisement
आता या गाण्याची एक जुनी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे, ज्याने प्रेक्षक आणि सेलिब्रिटी सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्री ऋचा चड्ढाने या व्हिडिओला 'खूपच क्यूट' म्हटले, तर विनोदवीर आशीष चंचलानी म्हणाला, "फराह आजही तशीच आहे!" स्वतः फराह खाननेही यावर प्रतिक्रिया देत आश्चर्याने म्हटले, "हे देवा!"
कोरियोग्राफरीनंतर दिग्दर्शनात कमावलं नाव
'जलवा' चित्रपट प्रदर्शित झाल्यावर फराहला थोडीफार ओळख मिळाली, पण तिला खरं यश मिळालं ते कोरियोग्राफीच्या जगात. 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटाने तिने कोरियोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केली. फराहच्या कोरियोग्राफीतील वेगळेपणा यामुळे तिला बॉलिवूडमध्ये खास स्थान मिळाले.
कोरियोग्राफर म्हणून पाच वर्षे काम केल्यानंतर, २००४ मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवले. शाहरुख खान स्टारर तिचा पहिला चित्रपट 'मै हूँ ना' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर तिने 'ओम शांति ओम', 'तीस मार खाँ' आणि 'हॅपी न्यू इयर' सारखे मोठे चित्रपट दिग्दर्शित केले, ज्यामुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली.
आज फराह खान फक्त चित्रपटांपर्यंत मर्यादित नाही; तर ती तिचा लोकप्रिय यूट्यूब चॅनलही चालवते, जिथे ती विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारते आणि पडद्यामागच्या मजेदार गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. गेली ३८ वर्षे फराह खान बॉलिवूडमध्ये सक्रिय असून काही रिपोर्ट्समध्ये सांगितल्यानुसार तिची एकूण संपत्ती ३५० कोटींच्या आसपास आहे.