आपल्यापैकी अनेकांना ही बाब माहिती नसेल की, देशातील शासकीय कार्यालयांमध्ये वर्षाचे 365 दिवस ध्वजारोहण केलं जातं. विशेष म्हणजे हे ध्वजारोहण अधिकाऱ्यांच्या हस्ते होत नाही. संबंधित कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मान मिळतो. ऊन असो किंवा पाऊस नियमानुसार हे कर्मचारी दररोज ध्वजारोहण करतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 12 ते 13 वर्षापासून उत्तम राम कुंभार, मुजीब खान पठाण, सय्यद अझरुद्दीन आणि प्रवीण नरवाडे हे चार कर्मचारी ध्वजारोहणाचं कार्य पार पाडत आहेत. या चार कर्मचाऱ्यांची 15 दिवसांची शिफ्ट असते.
advertisement
हे कर्मचारी सकाळी नेमून दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करतात आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरवतात. लोकल18 च्या टीमने या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी उत्तम राम कुंभार म्हणाले, "मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ध्वजारोहणाचं आणि ध्वज उतरवण्याचं काम करत आहे. हे काम करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. मला माझ्या सेवा निवृत्तीपर्यंत हे काम करायला मिळालं तर मला खूप आनंद होईल."
सय्यद असुद्दिन हे उत्तम कुंभार यांचे सहकारी आहेत. ते म्हणाले, "मीसुद्धा मागील 12 ते 13 वर्षांपासून हे काम करत आहे. आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना अशी जबाबदारी मिळणे फार भाग्याचं काम आहे."