नवनीतनगर येथील ‘डब्ल्यू’ विंग या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 510 मध्ये राहणारे केतन हरिलाल देढीया (वय 35) यांच्या घरात ही घटना घडली. सोमवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास केतन हे घर बंद करून बाहेर गेले होते. काही वेळाने घरी परतल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून लाईट सुरू केला. त्याच क्षणी घरात साचलेल्या गॅसमुळे जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण फ्लॅटला आग लागली.
advertisement
या स्फोटात केतन देढीया हे सुमारे 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचा परिणाम इतका भीषण होता की बाजूच्या फ्लॅट क्रमांक 511 मधील मेहुल शांतिलाल वासड (वय 40) आणि फ्लॅट क्रमांक 506 मधील विजय घोर (वय 45) यांनाही स्फोटाच्या धक्क्यामुळे दुखापत झाली.
याशिवाय इमारतीतील फ्लॅट क्रमांक 9 मध्ये राहणारे हरीश कांतीलाल लोढाया (वय 50) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा पार्श्व हे घराबाहेर असताना स्फोटामुळे खाली कोसळलेल्या स्लायडिंग काचांच्या तुकड्यांमुळे जखमी झाले. सुदैवाने केतन देढीया वगळता उर्वरित चार जणांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत.
प्राथमिक तपासात स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस गळती होऊन तो घरात साचला असावा आणि लाईट सुरू करताच विजेच्या स्पार्कमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.






