कल्याणजवळील टिटवाळा परिसरात विदेशी मद्याच्या बाटल्यांतून मद्य काढून त्यात बनावट दारू भरली जात होती. कल्याणच्या अबकारी विभागाच्या पथकाने टिटवाळा मांडा परिसरातील एका घरावर छापा टाकला. तेव्हा घरामध्ये हा गैरप्रकार सुरू होता. भरारी पथकाने बनावट मद्यसाठ्यासह एकूण 12 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरणी जयश्री केणे व रोहन केणे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. जयेश केणे यांच्या घरात हा कारखाना सुरू होता.
advertisement
भरारी पथकाला मांडा टिटवाळा परिसरात मुंबई बडोदा प्रस्तावित हायवेवर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार भरारी पथकाचे दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला. एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय आला त्यांनी ही गाडी थांबवून चौकशी केली. तेव्हा गाडीमध्ये विदेशी मद्यसाठा आढळून आला.
अबकारी विभागाच्या भरारी पथकाने तत्काळ चालक रोहन केणे याला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा बनावट दारू टिटवाळा मांडा परिसरात बनवत असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केणे यांच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरात बनावट बुच, प्लास्टिक जार, बनावट विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, असं साहित्य आढळलं. पथकाने तत्काळ हे सगळं साहित्य जप्त केले असून दोघांना अटक केली.
दरम्यान, बनावट दारू शहरातील ढाब्यांवर जात असल्याचा दाट संशय अबकारी विभागाला असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.






