जाणून घेऊयात जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे फायदे:
पचन सुधारतं:
बडीशेप खाल्ल्यानंतर जीभेला तर आराम मिळतोच मिळतो. मात्र पोटाच्या अनेक आजारांवर बडीशेप ही गुणकारी आहे. बद्धकोष्टता, गॅसेस, अपचन यासारख्या अनेक आजारांना दूर ठेवण्यात बडीशेप मदत करते. बडीशेपमध्ये अनेक नैसर्गिक एंझाईम्स असतात, जे अन्न पचवण्यासाठी मदत करतात. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही किंवा जर झाला असेल तर तो शरीराच्या बाहेर निघून जातो. बडीशेप चघळल्याने तोंडातल्या लाळेचं प्रमाण वाढतं. तसंच यकृत आणि पित्ताशयाचं कार्य सुधारून अधिक प्रमाणात पाचक रस उत्पादीत होतात, ज्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होऊन अन्न पचायला मदत होते.
advertisement
दंतविकार, तोंडाच्या आजारांवर गुणकारी:
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. बडीशेपच्या बियांमध्ये असे घटक असतात जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यामुळे जेवल्यानंतर तोंडातून वास येत नाही. त्यामुळेच कदाचित बडीशेपला मुखशुद्धी असं सुद्धा म्हणत असतील. दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी ही बडीशेप फायद्याची आहे. बडीशेपचे दाणे चघळल्याने दातांमध्ये अडकून पडलेली घाण दूर व्हायला मदत होते. बडीशेपच्या अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांमुळे तोंडातल्या जखमा, अल्सर लवकर बरं व्हायला मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि फिनोलिक संयुगं असतात. जे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. बडीशेप बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. शिवाय सांधेदुखी किंवा पोटदुखीच्या आजारवर बडीशेप खाणं फायद्याचं ठरतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने शरीराला विविध आजारांशी लढण्यास मदत होते.
मानसिक ताण दूर होतो:
ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. बडीशेप चघळल्याने मानसिक ताणही कमी व्हायला मदत होते. बडीशेपमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह आढळून येतं. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारतं. बडीशेप खाल्ल्याने शरीरातल्या ऊर्जेची पातळी कायम राहते. त्यामुळे नैराश्य दूर होऊन व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहू शकतो.