प्रेरणा सावंत या हॉटेलच्या मालकीण असून, त्यांनी 12 वर्षांचा मर्चंट नेव्हीचा व्यवसाय सोडून आपल्या बालपणीच्या स्वप्नासाठी हा प्रवास सुरू केला. त्यांच्या मनात एकच संकल्पना होती की मालवणी चव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची आणि त्या संकल्पनेतूनच स्वाद घरचा या हॉटेलचा जन्म झाला.
advertisement
हॉटेल सुरू झालं तेव्हा फक्त दोन कर्मचारी होते. आज 8 वर्षांनंतर 10-12 जणांची टीम त्यांच्यासोबत आहे. पण विशेष बाब म्हणजे आजही प्रेरणा सावंत स्वतः सर्व मसाले तयार करतात, प्रत्येक पदार्थात स्वतःची खास चव घालतात आणि मुख्य स्वयंपाक त्यांच्याच हातून होतो. त्यामुळेच भरलेलं पापलेट, कोंबडी-वडे थाळी, प्रॉन्स बिर्याणी, चिकन, मटण, मालवणी व्हेज थाळी हे पदार्थ आजही तितकेच प्रसिद्ध आहेत.
हॉटेलमध्ये दररोज ग्राहकांची मोठी गर्दी असते आणि वेटिंग असूनही लोक इथल्या जेवणासाठी तासंतास थांबतात. हे यश सहजसोपं नव्हतं पण प्रेरणा सावंत यांना त्यांच्या पतीचा संपूर्ण पाठिंबा लाभला. त्या नम्रपणे म्हणतात की या प्रवासाचं संपूर्ण श्रेय माझ्या पतीला जातं. त्यांचा विश्वास आणि साथ नसती, तर हे शक्य झालं नसतं.
आज स्वाद घरचा हे हॉटेल केवळ जेवणासाठीच नव्हे, तर मेहनत, स्वप्नपूर्ती आणि संस्कृती टिकवण्यासाठी उभं राहिलेलं एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.