चमोली : उपवासाची सवय असलेली व्यक्ती न थकता दिवस-दिवसभर उपाशी राहू शकते. परंतु उपाशी राहिल्याने एका ठराविक वेळेनंतर डोकेदुखी, उलटी, मळमळ असा त्रास होऊ लागतो. त्यामुळे अन्नपाणी आपल्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र अन्न केवळ शरिराला ताकद देण्याचं कार्य करतं का, तर नाही. खरंतर आपल्या रोजच्या आहारातला प्रत्येक पदार्थ विशिष्ट जीवनसत्त्व, पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण असतो. असे अनेक पदार्थ एकत्र करून बनवलेल्या जेवणातून ताकद मिळतेच, शिवाय शरिराचं विविध रोगांपासून रक्षण होतं. आज आपण अशाच एका पदार्थाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
लसूण, फोडणीतला आणि स्वयंपाकघरातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक. लसणामुळे फोडणीला सुगंध येतो आणि अन्नपदार्थांची चवही वाढते. मात्र त्यापलीकडेदेखील लसणाचं महत्त्व आहे. आपल्या अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे लसूण शरिरासाठी औषधी असतो. लसणामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसणात फॉस्फोरस, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॉलेट, नियासिन आणि थायमिन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे लसूण आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. परंतु तज्ज्ञ जेवणात घातलेल्या लसणापेक्षा त्याच्या कच्च्या पाकळ्या खाण्याचा सल्ला देतात.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्याच्या गौचर रुग्णालयातील डॉक्टर रजत सांगतात की, पोटासंबंधित आजार, हृदयासंबंधित आजार, सर्दी, खोकला आणि बद्धकोष्ठतेवर लसणामुळे आराम मिळतो. मात्र उपाशीपोटी कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास त्याचा शरिराला जास्त फायदा होतो.
पोटातले जंत मारणारा चहा; ना कोरा, ना दूधाळ, तरी लोक आवडीनं पितात!
लसूण पोटावर रामबाण!
डॉ. रजत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसूण मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पोटाचं आरोग्य उत्तम राहतं. उपाशीपोटी खाल्लेल्या लसणामुळे यकृत आणि जठराचं कार्य सुरळीत राहतं. शिवाय हगवण झाल्यास त्यावरही आराम मिळतो. लसणामुळे भूक लागते आणि अन्नपचन क्रिया व्यवस्थित पार पडते. लसणामुळे ताण-तणावाचं व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासही मदत मिळते.
वजन होतं कमी!
लसणामुळे शरीर स्वच्छ होतं. पोटातले किडे मरतात. शिवाय आहारात लसणाचा समावेश असेल, तर कर्करोग, मधुमेह, डिप्रेशन, इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यताही कमी असते. महत्त्वाचं म्हणजे कच्च्या लसणामुळे शरिरातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. दररोज सकाळी लसणाच्या 3 किंवा 4 पाकळ्या चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यासही मदत मिळते.
दरम्यान, लसणाची एलर्जी असलेल्या व्यक्तींनी तो खाऊ नये. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्यास त्वचेवर सारखी खाज आली, लाल चट्टे दिसले, पिंपल आले किंवा डोकेदुखी झाली, शरिराचं तापमान वाढलं की, तातडीने लसूण खाणं थांबवावं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g