छत्रपती संभाजीनगर : 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. ज्या तरुणाचं वय 30 वर्षांच्या घरात आहे, अशांनाही बदलत्या जीवनशैलीमुळं हृदयविकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा तरुणांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती दिलीये.
advertisement
बदलती जीवनशैली
सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैली. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांचे काम बैठ्या स्वरुपाचे झाले आहे. त्यासोबतच चालणे देखील कमी झालं आहे. आहारामध्ये देखील बदल झाले असून फास्ट फूड, जंक फूडचं प्रमाण वाढलंय. धूम्रपान आणि इतर व्यवसनांमुळेही काही तरुणांच्यात हृदयविकाराचे धोके वाढले आहेत.
कशी घ्यावी हृदयाची काळजी?
आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज चाललं पाहिजे किंवा तुम्ही सायकलिंग देखील करू शकता. आहारामध्ये कमीत कमी मीठ आणि साखरेचा वापर करावा. तसेच आहारामध्ये कडधान्य, पालेभाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश करावा. तुम्ही जर जिमला जात असाल, तर सहन होईल एवढाच वर्कआऊट करावा. तसेच जिम ट्रेनरच्या सल्ल्यानेच जीम करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान करणे टाळावे. धूम्रपान केल्यामुळे सर्वात जास्त हृदयावर परिणाम होतो, असं डॉक्टर सांगतात.
ताण-तणाव कमी करा
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी जंक फूड, फास्ट फूड कमी करून घरातील जेवणाला प्राधान्य द्यावं. आरोग्यदायी आहार घ्यावा. तसेच सध्याच्या काळात वाढलेले ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. तणावामुळे नैराश्य आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारची काळजी घेतल्यास नक्कीच हृदयविकाराचा धोका कमी होईल, असे डॉ. सपकाळ सांगतात.





