कोणत्याही ऋतूत प्यायलेलं कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी नेहमीच हानिकारक असतं. ते जास्त प्रमाणात प्यायल्यानं तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः किडनी, यकृत, त्वचा आणि वजनावर कोल्ड्रिंक्सचा परिणाम होतो. कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढू शकतो. जेव्हा जास्त प्रमाण कोल्ड्रिंक्स यकृतापर्यंत पोहोचतं तेव्हा ते ओव्हरलोड होतं आणि फ्रुक्टोजचं फॅट्समध्ये रूपांतर करतं. त्यामुळे यकृतामध्ये फॅट जमा होतं.
advertisement
या ड्रिंकमध्ये असलेली साखर हा घटक त्याला सर्वात धोकादायक बनवतो. या ड्रिंकच्या एका ग्लासमध्ये किती साखर असते हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हेरी वेल फिट वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, एका कोका कोला कॅनमध्ये सुमारे 10 चमचे साखर असते. जर आपण हे प्रमाण ग्रॅममध्ये पाहिले तर अंदाजे 39 ग्रॅम साखर एका कोका कोला कॅनमध्ये असते. ऑरेंज सोड्याच्या एका कॅनमध्ये 12 चमचे साखर असते. जर तुम्ही पॅकिंग केलेला सफरचंदाचा रस पित असाल तर तुम्ही त्यासोबत सुमारे 10 चमचे साखर देखील पोटात घेत आहात.
कोल्ड्रिंक्समध्ये दोन प्रकारची साखर असते. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे हे दोन प्रकार आहेत. ग्लुकोज साखर शरीरात त्वरित शोषली जाते आणि तिचं पचन होतं. पण, फ्रुक्टोज लिव्हरमध्येच साठवलं जातं. त्यामुळे जर तुम्ही रोज कोल्ड्रिंक पित असाल तर तुमच्या लिव्हरमध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणात जमा होऊ शकतं.
या शिवाय, कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे इन्शुलिन रेझिस्टन्सची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. इन्शुलिन हे एक असं संप्रेरक आहे जे आपल्या रक्तप्रवाहातून पेशींमध्ये ग्लुकोजचं वहन करतं. जेव्हा आपण शर्करायुक्त सोडा पितो तेव्हा आपल्या पेशी इन्शुलिनच्या प्रभावांबद्दल कमी संवेदनशील होऊ शकतात.