छत्रपती संभाजीनगर : नांदेड ते हडपसरदरम्यान धावणारी विशेष रेल्वे 19 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. तसंच 20 जून रोजीची हडपसर ते नांदेड रेल्वेही रद्द केली आहे. त्याचबरोबर सिकंदराबाद ते शिर्डी आणि शिर्डी ते सिकंदराबाद या रेल्वे 28 आणि 29 जून रोजी मनमाड ते शिर्डीदरम्यान दोन्ही बाजूंनी धावणार नाहीत. संबंधित रेल्वे मनमाड ते सिकंदराबाददरम्यानच धावेल.
advertisement
दौंड-निजामाबाद रेल्वे 26 आणि 30 जून या 2 दिवसांत नियमित मार्गावरून न धावता कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणीमार्गे धावेल. तर निजामाबाद-दौंड रेल्वे 25 आणि 29 जून रोजी याच मार्गावरून धावेल.
हेही वाचा : ...अन् शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी रेल्वे मार्गावर बसले आंदोलनासाठी!
पुणे-नांदेड एक्स्प्रेस रेल्वे कुर्डुवाडी, लातूर, परभणी मार्गानं 25 आणि 29 जूनदरम्यान धावेल. तर, नांदेड-पुणे एक्स्प्रेस परभणी, परळी, लातूर आणि कुर्डुवाडी दरम्यान 26 आणि 30 जून रोजी धावेल. संबंधित रेल्वेच्या मार्ग बदलामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर इथून मनमाड, नगर आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-हडपसर-नांदेड या विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर केल्या. नांदेड ते हडपसर ही विशेष गाडी दिनांक 22, 29 मे आणि 5, 12, 19 आणि 26 जूनला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 9 वाजता सुटणार असं नियोजन आहे. ही रेल्वे परभणी, छ. संभाजीनगर, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 11.20 वाजता पोहोचते. मे आणि जून महिन्यात मिळून या गाडीनं 6 फेऱ्या पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. तर, हडपसर ते नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्याही 6 फेऱ्या होणार होत्या. ही गाडी दिनांक 20, 30 मे आणि 6, 13, 20, 27 जूनला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी 3.15 वाजता सुटून दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, छ. संभाजीनगर, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 4.30 वाजता पोहोचणार, असं या गाडीचं नियोजन आहे. या विशेष गाडीचा उन्हाळी सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा झाला, परंतु आता फेऱ्या रद्द केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार आहे.