इंदोर : काही पदार्थ इतके स्वादिष्ट असतात की, आपण त्यांची भांडीही चाटून पुसून खातो. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थासोबत त्याचं ताटही चावून खावंसं वाटतं. आता लवकरच तुमची ही इच्छादेखील पूर्ण होणार आहे. होय, आता पदार्थांसोबत ताटही चावून चावून खाता येणार आहे.
मध्यप्रदेशातील इंदोर शहरात ही अनोखी भांडी तयार करण्यात आली आहेत. इंदोर हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं. इथल्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चक्क नाचणीची भांडी तयार केली आहेत. यात वाट्या, चमचे आणि लहान बश्यांचा समावेश आहे. ही भांडी बनवण्यासाठी नाचणीच्या पिठासह उडदाचं पीठ, गूळ आणि मिठाचा वापर करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे या भांड्यांची प्रयोगशाळेत चाचणीही झाली आहे. आता मध्यप्रदेश पर्यटन विकास बोर्डाकडून तिथल्या हॉटेलमध्ये ही भांडी वापरण्यावर विचारविनिमय सुरू आहे. येत्या काळात राजधानी दिल्लीत होणाऱ्या पर्यटन महापर्वात पहिल्यांदा नाचणीची भांडी सादर केली जातील.
advertisement
लसूण उपाशीपोटी खाल्ल्यास वजन झटपट होतं कमी! फक्त खाताना करू नका 'ही' चूक
भांडी आहेत पौष्टिक!
नाचणी हा आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. नाचणीच्या पिठात आयर्न, फायबर आणि अनेक पोषक तत्त्व असतात. त्यामुळे या पिठापासून बनवलेल्या भांड्यांमधून अन्नपदार्थ खाणंदेखील पौष्टिक आहे. या भांड्यांची चव थोडीशी खारट आणि गोड असते.
पोटातले जंत मारणारा चहा; ना कोरा, ना दूधाळ, तरी लोक आवडीनं पितात!
...म्हणून बनवली नाचणीची भांडी!
तृणधान्य आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, त्यांचं उत्पादन शेतकरी बांधवांसाठी किती महत्त्वाचं आहे, याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र महासंघाकडून 2023 हे वर्ष 'जागतिक तृणधान्य वर्ष' म्हणून साजरं करण्यात आलं. नाचणीचा समावेश तृणधान्यांमध्ये होतो. आता आहारात तिचा वापर फार कमी झाला आहे. परंतु नाचणी हा आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर पदार्थ आहे. त्यामुळेच लोकांना याविषयी माहिती मिळावी आणि भांड्यांमधून का होईना पण नाचणी पोटात जावी, यासाठी विद्यार्थ्यांनी ही भांडी तयार केली आहेत.
सुरक्षित आणि हेल्थी!
या भांड्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात भांड्यांमध्ये कोणतीही कमतरता आढळली नाही. शिवाय ही भांडी बुरशी आणि सूक्ष्म कीटकांपासून सुरक्षित असल्याचं या चाचणीतून समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे ही भांडी मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच, परंतु पशू-पक्ष्यांसाठीदेखील उपयुक्त आहेत.
अशी तयार झाली भांडी!
सुरुवातीला नाचणी आणि उडदाचं पीठ चाळून, मळून भांड्यांच्या साच्यात घातलं. त्यात प्रमाणानुसार गूळ आणि मिठाचा समावेश केला. त्यानंतर ओव्हनमध्ये या भांड्यांना बेक्ड करण्यात आलं. थंड, गरम, कोमट असे सर्व पदार्थ या भांड्यांमधून खाता येतील. अट एकच आहे की, या भांड्यांचा वापर केवळ एका महिन्याच्या आत करायचा आहे. जशी अन्नपदार्थांना एक्सपायरी डेट असते, तशीच या भांड्यांनादेखील आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g