गोंदिया : गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीचं गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने या तरुणीचा निर्घृणपणे खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात ही घटना उघडकीस आली. आचल प्रकाश कोबळे (वय २०, राहणार. बोंडराणी) असं मृत तरुणीचे नाव आहे. मृतक आचलचं गावातीलच दुसऱ्या समाजातील एका युवकासोबत सूत जुळलं होतं. आचल आणि तरुणाच्या प्रेमसंबंधाबद्दल मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांना माहिती होती. या दोघांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध असल्याने ते पळून गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ते गावात परत आले होते.
advertisement
दोन्ही कुटुंब समोरासमोर बसले आणि चर्चा झाल्यानंतर आचल वडिलांच्या घरी परतली. आचलच्या कुटुंबीयानी तिच्यासाठी स्थळ बघितलं होतं. तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते अशी चर्चा गावात होती. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास शेजारील महिलेला आचलच्या घरापासून काही अंतरावर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे घाव आढळले. याची माहिती महिलेनं कोबळे कुटुंबीयांना दिली.
यानंतर कुटुंबीयांनी आचलला तिरोडा येथील रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आचलच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली असून तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केलं आहे. घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. आचलचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा खूनाचा दाखल केला आहे.