अचानक सगळे पंखे बंद करून रात्री झोपावं लागत होतं इतका गारठा वाढला होता. आता 1 जानेवारीपासून तुरळ पाऊस पडत असल्याने उष्णता वाढली आहे. त्यामुळे हिट नको तर पंखा फास्ट आणि AC लावा म्हणायची वेळ आली आहे. रात्री घामाच्या धारा निघत आहेत. मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मात्र गारठा कायम राहणार आहे. मध्य प्रदेशात तापमान घसरल्याने ही स्थिती पुढचे 48 तास तरी कायम राहील.
advertisement
देशाच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी आणि दक्षिण भागात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील हवामानातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शेजारील मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानावर होणार आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून तेथे दाट धुकं आणि थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.
मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विशेषतः नागपूर, अमरावती, गोंदिया, आणि जळगाव पुढील ४८ तासांत किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होऊ शकते. यामुळे विदर्भात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तमिळनाडू आणि केरळमध्ये १० जानेवारीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे अरबी समुद्रातून बाष्प येण्याची शक्यता असून, याचा परिणाम कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग हवामानावर होऊ शकतो. या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात होणारी घट आणि बदलणारे हवामान लक्षात घेता, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील द्राक्ष, कांदा आणि रब्बी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृती तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. थंडी वाढल्यास काही भागात दव पडण्याचे प्रमाणही वाढू शकते.
