पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात निम्न दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणालीसोबतच एक ट्रफ लाईन उडिसाच्या उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरली आहे. उत्तर-पश्चिम राजस्थानातही आणखी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापुरात आज पावसाचा जोर कमी राहील. जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, या जिल्ह्यांत उद्यापासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील 48 तास मुसळधार पाऊस राहणार आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रासाठी काय अंदाज?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर 2025 मध्ये देशभरात मासिक पावसाचं प्रमाण सामान्यपेक्षा जास्त (109% पेक्षा अधिक) राहण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहील, मात्र ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पाऊस तुलनेने कमी राहू शकतो.IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी उत्तराखंडमध्ये सप्टेंबरमध्येही भूस्खलन आणि फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त केली आहे.
याचा परिणाम दिल्ली, दक्षिण हरियाणा आणि उत्तर राजस्थानसारख्या निचांकी भागांवर होऊ शकतो. महाराष्ट्र-गोवा आणि गुजरातमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज. विशेषतः 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढेल. गणपती विसर्जनाच्या काळात (3 ते 6 सप्टेंबर) जोरदार पावसामुळे विसर्जनाची तयारी आव्हानात्मक होऊ शकते.