अहमदनगर, 23 ऑगस्ट : शिर्डीचे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची आज घरवापसी झाली असून त्यांनी पुन्हा शिवबंधन बांधले आहे. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिर्डी लोकसभेची रंगत वाढणार असली तरी आघाडीतील इतर पक्ष त्यांना स्विकारणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेला एक प्रशासकीय अधिकारी 2009 साली थेट शिर्डीचा खासदार झाला होता. प्रशासकीय यंत्रणेत गट विकास अधिकारी आणि त्यानंतर साई-मंदिराचे कार्यकारी अधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना 2009 साली जणू काही खासदारकीची लॉटरी लागली होती. वर्षानुवर्ष स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या रूपाने काँग्रेसकडे राहिलेला शिर्डी मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. ही संधी साधत शासकीय सेवा निवृत्त झालेल्या वाकचौरेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि 2009 साली आघाडीचे दिग्गज उमेदवार रामदास आठवले यांचा दणदणीत पराभव केला. त्यास कुठेतरी मराठा बहुल असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात जातीय किनार होती आणि आठवलेंपेक्षा आपल्या जिल्ह्यातील आपला माणूस या भावनेनं जनतेनं त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं होतं.
advertisement
मात्र पुढे 2014 साली ऊद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी वाकचौरे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली असताना वाकचौरेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा हात धरला आणि खासदारकी लढवली. मात्र मोदी लाट असल्याने ऐनवेळी खासदारकी लढवणारे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे वाकचौरेंना पराभूत करत खासदार झाले. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपले आमदारकी साठीही श्रीरामपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नशिब आजमावले मात्र त्यांचा पराभव झाला. 2019 साली अपक्ष लोकसभा लढवली तिथेही पराभवच वाट्याला आला. आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाकचौरेंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून आजचा ठाकरे गटातील त्यांचा प्रवेश म्हणजे त्यांची 2024 ची शिर्डी लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जातेय.
मात्र दुसरीकडे आघाडी झाल्यास वाकचौरेंना विरोधही होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांनी उमेदवार चालला पाहिजे, असा व्यक्ती द्यावा लागेल आणि उमेदवारी कुणाला द्यायची हे आघाडी ठरवेल असं म्हटलंय.
(मोठी बातमी! आघाडी सरकारच्या काळातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरण बंद, CBIचा अहवाल कोर्टाने स्वीकारला)
एकीकडे रामदास आठवले यांनी आपण पुन्हा शिर्डी लोकसभा लढवणार असं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात आहेत. त्यामुळे जर महायुतीने जर शिर्डीची जागा आठवलेंना बहाल केली तर 2009 प्रमाणे पुन्हा वाकचौरे विरूद्ध आठवले अशी लढत बघायला मिळू शकते.
भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास
- 2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव
- भाजप शिवसेना युतीत शिर्डी मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला
- 2009 पासून शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत
- 2009 साली शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे ( हिंदू - चांभार ) यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला
- 2014 साली शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला
- शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका बसल्याने 2014 साली वाकचौरे यांचा पराभव
- सदाशिव लोखंडे अवघ्या 17 दिवसात प्रचार करून शिवसेनेकडून खासदार
- 2019 साली शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे तर भाऊसाहेब वाकचौरे यांची अपक्ष उमेदवारी
- पुन्हा शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा विजय तर भाऊसाहेब वाकचौरे यांचे डिपॉझिट जप्त
- 2019 च्या लोकसभा पराभवानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश
- 2019 साली श्रीरामपूर राखीव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मात्र तिथेही पराभव
- भाजप - शिवसेना युती तुटल्यानंतर भाजपकडून शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्न
- भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती झाल्यानंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंसोबत गेल्याने भाऊसाहेब वाकचौरे यांची कोंडी
- 2024 ला पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा असल्याने भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश
- वाकचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास विद्यमान खासदार सदाशिव ( शिंदे गट ) यांना मोठं आव्हान उभं राहाणार
- मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा आद्यपही कायम
- काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) दोन्हीही पक्ष महाविकास आघाडीत असल्याने शिर्डीची जागा कुणाला? याबाबत अंतिम चित्र स्पष्ट नाही
वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाने काय फरक पडणार?
- भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
- उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नगर जिल्ह्यात पुन्हा बळकटी मिळणार
- वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुक रंगतदार होईल
- शिर्डी लोकसभेत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ आणि विद्यमान आमदार
संगमनेर ( काँग्रेस ) - बाळासाहेब थोरात
श्रीरामपूर ( काँग्रेस ) - लहू कानडे
शिर्डी ( भाजप ) - राधाकृष्ण विखे पाटील
कोपरगाव ( राष्ट्रवादी - अजित पवार गट ) - आशुतोष काळे
अकोले ( राष्ट्रवादी - अजित पवार गट ) - किरण लहामटे
नेवासा ( अपक्ष - उद्धव ठाकरे समर्थक ) - शंकरराव गडाख
