केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमापेक्षा रायगडमध्ये त्यांनी तटकरे कुटुंबीयांच्या घरी स्वीकारलेल्या पाहुणचाराचीच महाराष्ट्रात जास्त चर्चा रंगली. एकेकाळी सिंचन घोटाळ्यात तटकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करून राज्यात आघाडी सरकारविरोधात रान उठविलेल्या भाजपने सत्तेच्या वाटपात मात्र राष्ट्रवादीसहित तटकरे यांच्याशी बरोबर जुळवून घेतले आहे.
advertisement
तटकरेंचा आग्रह, अमित शाहांच्या हेलिपॅडसाठी १ कोटी ३९ लाख
अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यासाठी शासन आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. रायगडवरून २० किमी अंतरावर असलेल्या सुतारवाडीत गृहमंत्री शाह हेलिकॉप्टरने गेले. शाह यांच्यासाठी सुतारवाडीत बनविलेल्या ४ हेलिपॅडसाठी शासनाने १ कोटी ३९ लाखांचे कंत्राट (टेंडर) काढले होते. दैनिक 'मीड डे' या वर्तमानपत्रात ९ एप्रिल रोजी हे कंत्राट (टेंडर) छापून आले होते. तटकरे यांच्या आग्रहासाठी आणि शाह यांच्या जेवणासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी का करण्यात आली? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खासहेलिपॅड? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाहांना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवाल करीत तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा, अशा शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.