बीड : केज तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या एका आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही खंडणी गोळा करताय, येथे येऊन भूमाफिया झालात, अशा शब्दात बजरंग सोनावणे यांनी जमावासमोरच तहसीलदारांना झापले आहे.
बजरंग सोनावणे म्हणाले, तुम्ही खंडणी गोळा करताय, येथे येऊन भूमाफिया झाले आहेत. अवादा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय अन् वर पत्र देखील देत आहे. मी दिल्लीत या प्रश्नावर बैठक घेतली, त्यांनी सांगितलं तहसीलदाराला असे सांगतो म्हणून.. तुम्हाला वाटत आहे इथे कोणी मालक नाही म्हणून मी एका बाजूने सगळीकडे सुरू आहे. तुम्हाला एका बाजूने चालता येणार नाही नियमाने करावे लागेल. तुमच्या खुर्चीचा मान ठेवून. सांगत आहे.
advertisement
काय म्हणाले बजरंग सोनावणे?
तुम्ही एकाची बाजू घ्यायची बंद करा खुलेआम सांगतोय, काय नाटकं लावले आहेत. तुम्ही पचका करून टाकला सगळा.. तुम्ही चांगले तहसीलदार आहात पाच जण घरी गेले आहेत. तुम्हाल वाटलं मी गप्प बसलोय म्हणून तुमची शंभर प्रकरण आहेत. हा काही घरचा कायदा आहे असं वाटलं का तुम्हाला, असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी उपोषणाच्या ठिकाणीच तहसीलदार राकेश गिड्डे यांना सुनावले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला खासदारांनी अशा प्रकारे जाहीररीत्या झापल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.
अवादा कंपनी चर्चेत
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा आणि अवादा कंपनी चांगलीच चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवादा कंपनी आणि वाल्मिक कराड व त्याची दहशत चर्चेचा विषय बनला होता याच अवादा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना एका शेतकरी महिलेचा गेल्या आठवड्यात जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीच्या अन्यायकारक कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या एका शेतकरी परिवारातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने परस्पर विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या. या अन्यायाविरोधात त्या महिलेचा परिवार लढत होता. शेवटचा उपाय म्हणून त्यांचा संपूर्ण परिवार उपोषणाला बसला होता.